आमदार बंटी भांगडिया यांचे नागरिकांना आवाहन..... वॉटरशेड यात्रेतून सर्व योजनांचा फायदा घ्या.....
पारडी ठवरे येथे यात्रेचा समारोप.....
नागभीड दि. १७/३/२०२५ :: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतीच्या विकासासाठी केंद्रिय अर्थसंकल्पात मोठी तरतूद केलेली असुन यातील विविध योजनांची माहिती व तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत वॉटर शेड जनजागरण यात्रा आपल्या गावात आलेली आहे . या वॉटर शेड यात्रेच्या माध्यमातून ज्या योजना आहेत त्या सर्व योजनांचा फायदा घ्यावा असे आवाहन आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी केले. या योजनेअंतर्गत नागभीड तालुक्यातील अनेक गावांचा समावेश नसल्याने त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरु असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
नागभीड तालुक्यातील पारडी ठवरे या गावामध्ये कृषी विभाग व जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना- पाणलोट विकास घटक २.० अंतर्गत वॉटर शेड यात्रेचे आगमन झाले असता त्यानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय समारोपीय कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पारडी ठवरे चे सरपंच युवराज दोनोडे , उपसरपंच नंदकिशोर खोब्रागडे , माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गजपुरे, कृउबास सभापती आवेश पठाण, माजी पं. स. सदस्य संतोष रडके , नागभीड न.प.चे माजी उपाध्यक्ष गणेश तर्वेकर , जिल्हा जलसंधारण अधिकारी निलिमा मंडपे , उपविभागीय जलसंधारण अधिकारी व्ही. डी. घोटकर, तालुका कृषी अधिकारी शिवकुमार पुजारी आदी मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थित होती.
जिल्हा जलसंधारण अधिकारी निलिमा मंडपे यांनी लोकसंख्या वाढत असली तरी जमीन आपल्याला वाढवता येणार नाही. त्यामुळे आज जी जमीन आपल्याकडे आहे त्या जमिनीला कसदार करायचं आहे. त्यासाठी आपल्या गावातील पाणी आपल्याला आपल्याच गावात जिरवायचे आहे. त्याअनुषंगाने वॉटरशेड यात्रेच्या सर्व योजना आपण नीट समजून घ्याव्या व गावात अमलात आणाव्या असे आवाहन केले.
सलग आठ दिवस चाललेल्या चंद्रपुर जिल्ह्यातील या यात्रेचा समारोप पारडी ठवरे येथे होत असतांना वॉटरशेड यात्रा प्रकल्प समन्वयक माणिक लांडगे यांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनाबाबत त्यांचा आमदार बंटी भांगडिया यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तत्पूर्वी वाटरशेड रथयात्रेचे पुजन करण्यात आले. कार्यक्रमानंतर ही रथयात्रा गडचिरोली जिल्ह्याकडे मार्गस्थ करण्यात आली.
कार्यक्रमाचे औचित्य साधून गावातील मजगी कामांचे भूमिपूजन तथा लोकार्पण आमदार भांगडिया व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण सुद्धा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गावातील महिला बचतगटांना या योजनेअंतर्गत रोजगार वाढीसाठी अनुदानाचे वाटप करण्यात आले. ग्रामस्थांना मृद व जलसंधारणाची शपथ देऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी शिवकुमार पुजारी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शाम हेडाऊ यांनी तर आभार प्रदर्शन कृषी पर्यवेक्षक आत्राम यांनी केले.कार्यक्रमाला महिला शेतकऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती.
