भोपळे विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी राबविला 'चला जाऊया वनाला' उपक्रम
तेल्हारा |मनोज भगत ता.प्र. :: सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने सहदेवराव भोपळे विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय हरितसेना अंतर्गत 'चला जाऊया वनाला' हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना निसर्गरम्य वातावरणात वनभ्रमंती द्वारे निसर्ग अभ्यास, वनाची ओळख करून देण्यासाठी अंबाबरवा अभयारण्य येथे निसर्ग अभ्यास सहलीचे आयोजन निसर्गकट्टा या संस्थेच्या समन्वयातून करण्यात आले होते. सर्वप्रथम निसर्गकट्टाच्या मार्गदर्शनात शाळेत अंबाबरवा अभयारण्य यावर स्लाईड शो दाखवून त्यावर आधारित लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा या सहलीत समावेश करण्यात आला होता. या सहलीसाठी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिलकुमार भोपळे, कार्यवाह श्यामशील भोपळे, सामाजिक वनीकरण विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी श्रद्धा जयस्वाल यांनी शुभेच्छा व्यक्त करीत विद्यार्थ्यांना काळानुसार बदल होत चाललेल्या सिमेंटच्या या जगात निसर्गाशी जवळीक साधता यावी, यासाठी शासनाच्या वतीने आयोजित ही निसर्ग अभ्यास सहल विद्यार्थ्यासाठी पर्यावरण सुरक्षिततेच्या जनजागृतीसाठी प्रेरक ठरेल, असा आशावाद व्यक्त केला. या अभ्यास सहलीत अंबाबरवा अभयारण्यात वृक्षारोपण,नेचर ट्रेल, नेचर गेम, मेळघाट व्याघ्र प्रकल्पावर चित्रफित दाखविण्यात आली, अश्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अंबाबरवा अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील वाकोडे यांच्या हस्ते या सहलीत सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. निसर्गकट्टाचे संस्थापक अमोल सावंत, अध्यक्ष अजीम शेख यांनी विद्यार्थ्यांना वनात आढळणाऱ्या प्राणी, पक्षी, विविध प्रकारच्या प्रजाती व जैवविविधतेची माहिती दिली. वनाबद्दलच्या माहितीने भरगच्च असलेल्या या सहलीचा समारोप विद्यार्थ्यांच्या अनुभवाचे सादरीकरण करून करण्यात आले. परतीच्या प्रवासात हिवरखेड येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटीकेला भेट देऊन तेथे रोपांची निर्मिती कशी होते याबाबत येथील कर्मचाऱ्यांनी माहिती दिली. या अभ्यास सहलीत शाळेच्या एकूण ५० विद्यार्थ्यांसह, शिक्षक-शिक्षिका, पालक प्रतिनिधी तसेच सामाजिक वनीकरणाचे वनक्षेत्रपाल संतोष गिरणारे, वनरक्षक संजय सुईवाल यांनी सहभाग नोंदविला होता. शाळेचे विभाग प्रमुख स्नेहल भोपळे, प्राचार्य संतोषकुमार राऊत व पर्यवेक्षक गणेश खानझोडे यांच्या मार्गदर्शनात सौ.प्रतिभा इंगळे, अमोल येऊल, पालक प्रतिनिधी प्रभाकर जाधव, कु.जया लाखोटीया, मंगेश भड,फोटोग्राफ्रर राजकुमार निमकर्डे, वनविभागाचे कर्मचारी, इको क्लबचे विद्यार्थी छात्र यांनी सहलीच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.
