Top News

आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये संस्काराचे महत्व वाढत आहे - प्रा. डॉ. गोपाल झामरे

आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये संस्काराचे महत्व वाढत आहे - प्रा. डॉ. गोपाल झामरे





:: मनोज भगत (ता.प्र.) तेल्हारा - वर्तमान शिक्षण पद्धती मध्ये स्पर्धात्मकता आणि रोजगाराभिमुखता हे दोनच उद्देश असल्यामुळे टक्केवारीच्या जीवघेण्या स्पर्धेमध्ये आजचा विद्यार्थी पूर्णपणे भरडल्या जाऊन  त्याची फक्त टक्केवारी वाढत आहे. गुणात्मक मात्र वाढ होत नाही तसेच  रोजगाराभिमुखते मुळे डॉक्टर  वकील अभियंते निर्माण होत आहेत . आदर्श माणूस मात्र निर्माण होत नाही  कारण आजच्या शिक्षणातून शिक्षणासोबत आदर्श मनुष्य निर्माण होण्याकरिता त्या शिक्षण पद्धतीमध्ये संस्काराला अनन्यसाधारण महत्त्व  आहे असे अभ्यासपूर्ण मत श्री संत वासुदेवजी महाराज व विद्यावाचस्पती श्रीधरस्वामी महाराज या संतद्वायांचे कृपांकीत डॉ. प्रा. गोपाल झामरे यांनी मांडले. ते  श्री संत वासुदेव महाराज स्मृती मंदिर श्री ज्ञानेश्वर आश्रम वारी भैरवगढ येथे आयोजित श्री माऊली सर्वांगीण विकास बालसंस्कार शिबिरातील विद्यार्थ्यांशी हितगुज करत असताना बोलत होते .

 ते पुढे म्हणाले की  पूर्वी गुरुकुल पद्धतीच्या शिक्षण प्रणालीमध्ये माता-पिता आपल्या मुलांना शिक्षणाकरिता आणत असत आणि श्री गुरूंना नम्रतापूर्वक सांगत असत की गुरुजी आमच्या मुलाला शिक्षणासोबत आदर्श माणूस बनवा अर्थातच तत्कालीन गुरुकुल पद्धती हे आदर्श मानवनिर्मितीचा कारखाना होता आज मात्र नुसतं शिक्षण घेऊन  सुशिक्षित मनुष्याचा भरणा वाढत आहे पण सुसंस्कारित आदर्श व्यक्ती मिळणे दुर्मिळ होत आहे.   कारण या क्षेत्रात संख्यात्मक नाही तर गुणात्मक वाढीचे महत्व अनन्यसाधारण वाढत आहे . म्हणून आता नवीन शिक्षण प्रणाली २०२० येत आहे. 

यामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास व्हावा या साठी  भारतीय शिक्षण पद्धती या विषयाचा समावेश अभ्यासक्रमामध्ये करण्यात आलेला आहे .  पण गुरुवर्य श्री संत वासुदेव जी महाराजांनी १९३९ ला हे ओळखलं होतं आणि म्हणून त्यांनी तेव्हापासून बाल संस्कार शिबिर सुरू करून  तो वारसा आजतागत त्यांनी व त्यांच्या नंतर त्यांचेच कृपांकित शिष्य यांनी सुरू ठेवलेला आहे. 

असे अनेक ऐतिहासिक तथा संत श्री वासुदेवजी महाराजांच्या जीवन चरित्रातील दाखले देऊन अगदी चपखलपने त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले . यावेळी श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिकासह प्रस्ताविक केले आणि योगायोगाने श्रीयुत झामरे यांचा ५२ व्या वाढदिवसाच्या औचित्य साधून आश्रमाच्या वतीने त्यांचे शाल तथा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला . तर आभार प्रदर्शन  निलेश महाराज जाणे व सूत्रसंचालन  गौरव महाराज माळी यांनी केले असे  ज्ञानेश्वर महाराज भालतिलक हे कळवितात.

Previous Post Next Post