रावण दहन तात्काळ बंद करा....गोंडवाना विद्यार्थी संघटनेची मागणी....
विदर्भ माझा न्युज 24 - चांदागड (चंद्रपूर)
गोंडवाना विद्यार्थी संघटनेच्या वतीने दि. १३/१०/२०२३ ला पोलीस अधिक्षक रवींद्रसिंग परदेसी तथा जिल्हाधिकारी यांना मुळनिवासी यांचे आराध्य दैवत महात्मा रावण यांच्या पुतळ्याचे दहन प्रथा बंद करण्यात यावी या आशयाचे निवेदन देण्यात आले. विशिष्ट समाजाच्या इतिहासकार प्रवचनकारांनी अत्यंत विभत्स स्वरुपात राजा रावणाची मांडणी केली. मात्र रावणाचे व्यक्तिमत्व अगदी विशेषणाच्या पलीकडे होते. त्यांनी अनार्य मुळनिवासी लोकांच्या संस्कृतीची नवी व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न केला. रावणाच्या बदनामी मागे प्रस्थापितांचे षडयंत्र आहे.
मुळनिवासी राजा रावण हे एक दार्शनिक तत्वज्ञानी, धर्मीक, राजकीय, सामाजिक व युध्द कौशल्यात निपुण होते त्यांनी अनेक सदर कलाकृती निर्माण केल्या. वनस्पती शास्त्र आयुर्वेदात त्यांचे योगदान आहे अनेक बाबींची नोंद अभ्यासकांनी घेतली आहे. वैभव संपन्न आदिवासी संस्कृतीच्या महानायकाला येथील प्रस्थापितांच्या विशिष्ट समाजाच्या प्रवृत्तीने जाणीव पूर्वक बदनाम केले. मुळनिवासीच्या इतिहासाची चुकीच्या पद्धतीने मांडणी केलेली आहे. संविधानातील कलम २५ असे म्हणतो की कोणत्याही धर्माच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत असे नमूद असतांना देशातील निवडक काही समुदायाकडून रावण दहानासारखी वाईट प्रथा दरवर्षी फार मोठा प्रमाणात महोत्सव म्हणून साजरी केली जाते. रावणाची प्रतीकात्मक प्रतिमा दहन करून सामाजिक शांतता भंग करणा-यावर भारतीय दंड संहिता १८६० अंतर्गत १५३, १५३ (अ), २९५, २९५ (अ), २९८ तसेच मुंबई पोलीस अधिनियम नुसार १३१, १३४, १३५ प्रमाणे फौजदारी गुन्हे दाखल होते.
तसेच सामाजिक सहिष्णुतेला धोका निर्माण होऊन दोन समुदायामध्ये कलह निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून रावण दहन कुप्रथा तात्काळ बंद करावे. या संबंधीचे निवेदन पोलीस अधिक्षक / जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्यपाल, मुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री, अनुसूचित जनजाती आयोग यांना देण्यात आले. निवेदन देतांना गोंडवाना विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सारंग कुमरे, सचिव राज पोरेते, गणपत नैताम, अविनाश मेश्राम, जितेंद्र येटे, अमर टेकाम, रोहीत मडावी, संदिप घोडाम इत्यादी गोंडवाना विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

