Top News

Balharshah: Final touch on Bappa's idol

 बल्हारशाह : बाप्पांच्या मुर्तीवर अखेरचा हात



 विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह - विषेश प्रतिनिधी : रोहीत लोनारे 

गणपती बाप्पांचे आगमन अवघे दोन दिवसांवर आले असताना, बल्हारशाह तालुक्‍यातील गणेशमूर्तींच्या कारखान्यांत मूर्तींवर अखेरचा हात फिरवून त्यांचे स्वरूप सर्वांगसुंदर करण्याची धांदल उडाली आहे. शाडूची माती, रंग, आदी कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने मागील वर्षीच्या तुलनेत मूर्तींच्या किमतीही वाढल्या आहेत. 


 गणेश चतुर्थीच्या महिनाभर आधीच मूर्तीच्या बुकिंगला सुरवात होते. मूर्तीचे डोळे, दागिने आदी रंगरंगोटीचे काम सध्या सुरू आहे. गणेश मंडळांबरोबर आता घरगुती गणपतींसाठीही नावीन्यपूर्ण मूर्तींना वाढती मागणी आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्वच भागांतून शाडूच्या मूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. शाडूच्या मूर्तींच्या किमतीत देखील वाढ झाली आहे. 



 मूर्तीसाठी वापरल्या जाणाऱ्या सोनेरी, चंदेरी रंगाच्या किमती वाढल्या आहेत. गाजलेले चित्रपट, पौराणिक मालिकांमधील नावाजलेल्या पात्रांच्या रूपांत मूर्ती तयार करून देण्याची मागणी मूर्तिकारांकडे केली जाते.


अशा भाविकांनी सहा महिने अगोदर बुकिंग केले आहे. बाहुबली, बाजीराव, जय मल्हार, लालबागचा राजा, दगडूशेठ गणपती, टिटवाळा गणपती, अशा अनेक मूर्तींना सध्या मोठ्या प्रमाणात मागणी आहे. बल्हारशाह येथील कीशोर दाभेकर, अनीकेत दाभेकर यांच्या गणपतींच्या कारखान्यातील शाडूच्या मूर्तींना विशेष मागणी आहे. 



भक्तांच्या मागणीनुसार तेथे मूर्ती बनविल्या जातात. हा त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय असून, दुसरी पिढी त्यात उतरली आहे.  अनीकेत दाभेकर, यश दाभेकर यांनी हा व्यवसाय पुढे सुरू ठेवला आहे. बल्हारशाह तालुक्‍यातील गणेशमूर्तींच्या कारखान्यात सध्या ग्राहकांची गर्दी वाढत आहे.

Previous Post Next Post