आरोग्यदायी जीवनासाठी निसर्ग जपाच..निसर्गाशिवाय मानवी जीवन अशक्यच - बंडू धोत्रे
विदर्भ माझा न्युज 24 - चांदागड (चंद्रपूर)
आपल्या अवतीभवतीचा निसर्ग आपणास नेहमीच आकर्षित करतो. निसर्गाच्या सानिध्यात राहायला प्रत्येकाला आवडते. त्यामुळेच निसर्ग आपल्या जीवनातील महत्त्वाचा घटक आहे. निसर्गाशिवाय मानवी जीवन अशक्य आहे. मात्र अनावश्यक गोष्टींचा हव्यास, भौतिक सुखाच्या आहारी गेल्याने आपण निसर्गावर आघात करीत एकप्रकारे मानवावरच अन्याय करीत आहोत.
निसर्गाशिवाय मनुष्य जीवनाची कल्पनाच करवत नाही. निसर्ग आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. जंगल, नदी, डोंगर-पर्वत, तलाव, नाले, विविध फुलझाडे, वृक्ष-वेली, झाडेझुडपे यांचे एकंदरीत स्वरूप म्हणजे निसर्ग आणि याच निसर्गाच्या सानिध्यात मानव अनादी काळापासून राहत आलेला आहे. याच निसर्गातील वन्यप्राणी, पशू-पक्षी प्राणीही येथे आनंदात राहतात. या साऱ्यांच्या उदरनिर्वाहासाठी निसर्ग अन्न-निवाऱ्याची सोय करतो.
निसर्गाच्या सानिध्यात राहून मनुष्याने प्रगती केली. निसर्गामुळे मनुष्याच्या जीवनात खूप चांगले बदल घडत गेले. निसर्गाने मानवाला पावलोपावली मदत केली. मनुष्याला प्रगती करण्यासाठी लागणारी नैसर्गिक संसाधने निसर्गाने नेहमीच प्रदान केली आहेत. निसर्गापासून म्हणजे वृक्ष, झाडांपासून प्राणवायू मिळतो. आपले जीवन म्हणजे श्वसन प्रणाली निसर्गाद्वारे नियंत्रित केली जाते. फक्त निसर्गाच्या सानिध्यात आल्याने प्रसन्न अनुभवासोबतच स्फूर्ती, मन प्रफुल्लित होत ताजेतवाने होण्याचा आनंद मिळतो. निसर्ग आपल्या मेंदूची क्रियाशीलता वाढवतो, मानसिक ताणावात असलेल्या व्यक्तींना निसर्गाच्या सानिध्यात शांती मिळते.
एकंदरीत विकासाच्या प्रक्रियेचा १३५० कोटी वर्षाचा मानवी इतिहास असलेल्या तीन लाख वर्षांच्या मानवी उत्क्रांतीच्या काळात जे झाले नाही ते अलीकडच्या शतकात आपण केले. निसर्गाची अपरिमित हानी आपण केली. निसर्ग मानवाच्या खूप आधीपासून अस्तित्वात आहे आणि तेव्हापासून त्याने मानवाची काळजीच घेतली. निसर्गाचे रूप असलेले जंगल, डोंगर-पर्वत, वृक्षवेली, वनस्पती, प्राणी-वन्यप्राणी, आकाश, चंद्र-सूर्य-तारे आदी सर्वच मनावासाठी समान घटक आहेत.
संत तुकाराम महाराज म्हणतात,
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे
पक्षीही सुस्वरे। आळविती।।’
आपले आरोग्य नीट राहण्यातही निसर्गाचा मोलाचा वाटा आहे. वेगवेगळ्या आजारांवरील औषधे ही याचा निसर्गामुळे आपल्याला उपलब्ध होतात. आपल्या आजूबाजूला असलेले वृक्षराजीमुळे निसर्गाचा समतोल राखला जातो. आपल्या दैनंदिन जीवनात आपण निसर्गातील भरपूर गोष्टींचा उपयोग करतो. निसर्ग आपल्याला निस्वार्थपणे अनेक गोष्टी देतो. तरी निसर्गाचा ऱ्हास मानवाकडून केला जात आहे. अलीकडच्या काळात जलप्रदूषण, वायूप्रदूषण, हवाप्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या अतिरेकामुळे होणाऱ्या विनाशापूर्वी आपण या प्रदूषणांवर उपाययोजना केल्या नाहीत तर याचे मोठे दुष्परिणाम भोगावे लागतील. वाढते औद्योगिकीकरण, जंगलतोड, खाणकाम, रस्ते विकास, डोंगर पर्वत समतोल करणे, विविध डॅम यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते. आपल्या आजूबाजूला असणारे वृक्ष प्रदूषण कमी करण्यास मदत करतात. वृक्षांची संख्या कमी झाल्याने तापमानात वाढ, पाऊस न पडणे अशा अनेक समस्यांचा सामना आपल्याला करावा लागू शकतो.
आपले आचरण, विचारातून एकंदरीत निसर्ग म्हणजे अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी आणि जल या पंचमहाभूतांचा आदर करायला शिकवणारे आणि शाश्वत जीवनशैलीचा मंत्र देणारे निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी होय. मानवाच्या अस्तित्वासाठी शाश्वत निसर्गपूरक, जीवनशैली किती आवश्यक आहे, हे त्यांना शंभर वर्षांपूर्वी जाणवले होते. त्यांचे आत्मचरित्र वाचताना त्यांचे पर्यावरणपूरक विचार लक्षात येतात. महात्मा गांधी म्हणतात, ‘माणसाच्या गरजेसाठी पृथ्वीवर पुरेसं आहे, पण माणसाच्या लोभासाठी नाही.’ ‘The world has enough for everyone’s need, but not enough for everyone’s greed’.
निसर्ग आहे म्हणून आपले अस्तित्व आहे. निसर्ग नसेल तर आपणही नसणार. निसर्गाने दिलेले विविध रूपातील वरदान, पृथ्वीवरील परिचलनासाठी आवश्यक आहे. मानवजातीच्या कल्याणासाठी निसर्गाचे संवर्धन आपले कर्तव्य आहे. आपण निसर्गाचा ऱ्हास थांबवून नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजे.
अध्यक्ष, इको प्रो संस्था, चंद्रपूर
मो. ९३७०३२०७४६
