शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे ! पावसाने पाठ फिरवल्याने बळीराजा संकटात....
विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना
जून मध्यावर आला तरीही पावसाचा पत्ताच नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरवर्षी मॉन्सूनच्या पावसापूर्वी होणाऱ्या वळीवाच्या पावसावर आत्तापर्यंत सुमारे २५ ते ३० टक्के पेरण्या पूर्ण होतात. यंदा मात्र पावसाने पूर्णतःच ओढ दिल्याने विदर्भातील शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत.
ज्येष्ठातली पौर्णिमा अर्थातच वटपौर्णिमा होऊन गेली तरी पावसाचा थांग पत्ताच नाही. मोसमी पावसाच्या भरवशावर अवलंबून असलेले शेतकरी खरीप हंगामातील शेतीकामासाठी सज्ज झाले आहेत; मात्र पावसाचा थेंबही पडत नसल्याने शेतीकामे रखडली आहेत. शेतकऱ्यांचे डोळे पावसासाठी आभाळाकडे लागले आहेत. मृग नक्षत्रात धानाच्या पेरणीची मूठ सोडली जाते. धान पेरणीसाठी शेतजमिनीची नांगरणी करताना कडक जमिनीमुळे शेतकरी आणि नांगर ओढणाऱ्या बैलांची चांगलीच दमछाक होत आहे.
त्यामुळे कधी एकदाचा पाऊस पडेल यासाठी शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे; मात्र पाऊस काही पडत नाही. कधी समाधानकारक तर कधी अतिनुकसान करणारा तर कधी भरवसा नसलेल्या अशा या लहरी हवामाच्या मोसमी पावसावर शेतकर्यांची शेती अवलंबून आहे.
जेष्ठ शेतकरी आठवणी सांगतात की, नियमित आणि वेळेवर पावसाची सुरवात झाल्यामुळे वटपौर्णिमेलाच भाताची लावणी केली जायची. किती दा तरी असे घडले आहे; मात्र यावर्षी अजूनही पेरणीच झाली नाही. सध्या मोसमी पावसाचा हंगाम सुरू झाला असला तरी पाऊस मात्र गायब झाला आहे. त्यामुळे शेतीशी निगडित सर्वच कामे खोळंबली आहेत. याचा थेट परिणाम हा अर्थकारणावर होणार आहे.

