एसटी बस राज्यभरात धावण्यास सज्ज,प्रवाशांना दिलासा...
विदर्भ माझा न्युज 24 - मुंबई :-
करोना प्रादुर्भावामुळे जिल्हातील एसटी सेवा बंद करण्यात आली होती. आता करोना स्थिती नियंत्रणात आल्याने बस सेवा सुरू करण्यात याव्यात, असे पत्र हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी महामंडळाच्या परभणी विभागाला पाठवले आहे. याचप्रमाणे अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी आपआपल्या जिल्ह्यांतर्गत गाव-तालुक्यातील एसटीसेवा पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी स्थानिक एसटी अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई आणि उपनगर जिल्हाधिकाऱ्यांकडून एसटी गाड्या सुरू करण्याबाबत मुंबई विभागाला अद्याप कोणतेही पत्र आलेले नाही. तसेच गाड्या सुरू करण्याबाबत काही आदेशही मिळालेला नाही. यामुळे मुंबईहून ये-जा करणाऱ्या बस सर्वसामान्यांसाठी बंदच राहणार आहेत. सध्या केवळ अत्यावश्यक प्रवाशांसाठी एसटी बस सेवा सुरू राहणार असून, यातून प्रवास करताना सरकारच्या अधिक कडक निर्बंधाचे अत्यंत काटेकोर पालन करणे गरजेचे असणार आहे, असे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिकाराचा योग्यवापर
करोना रुग्णसंख्येत मोठी घट होत असल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळत आहे. जिल्ह्यातील अर्थचक्र पुन्हा वेगाने सुरू करण्यासाठी, करोना संकटाचे मळभ दूर सारून नव्याने सुरुवात करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिकाराचा योग्य वापर सुरू झाल्याच्या चर्चा एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये रंगू लागली आहे .
