Top News

नागभीडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; आंतरराष्ट्रीय संशोधन क्षेत्रात डॉ. अतुल नागपुरे यांची उल्लेखनीय कामगिरी....मॉलिक्युलर स्ट्रक्चर ॲनालिसिस डिव्हाइसला यूके पेटंट प्रकाशित

   



नागभीड : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीशी संलग्नित राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय, नागभीड येथील रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. अतुल सोपान नागपुरे यांनी ‘ऑरगॅनिक केमिस्ट्री मॉलिक्युलर स्ट्रक्चर ॲनालिसिस डिव्हाइस’ या संकल्पनेवर आधारित नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे. या संशोधनासंदर्भातील यूके पेटंट क्रमांक ६५४७४३६ चे दस्तऐवज दाखल होऊन प्रकाशित झाल्याने नागभीडच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या या संशोधनात्मक कामगिरीचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

रसायनशास्त्रातील सेंद्रिय संयुगांच्या आण्विक संरचनेच्या विश्लेषणाशी संबंधित या तंत्रज्ञानाच्या विकासामुळे संशोधन क्षेत्रात नावीन्यपूर्ण संकल्पनेची भर पडली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पेटंट दस्तऐवज प्रकाशित होणे ही महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.

या संशोधनासाठी डॉ. अतुल सोपान नागपुरे यांच्यासमवेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर येथील रसायनशास्त्र पदव्युत्तर विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. राजेंद्र एस. डोंगरे यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. तसेच संशोधक अभ्यासक प्राची प्रदीप खोब्रागडे, डॉ. रश्मी जोशी, हर्षद सुधाकर शेरकी आणि ओम अनिल पडघन यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

डॉ. अतुल सोपान नागपुरे यांच्या संशोधनाची व्याप्ती आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तारली आहे. त्यांच्या नावावर आतापर्यंत दोन अमेरिकन पेटंट, एक युरोपियन पेटंट, दोन यूके पेटंट आणि पाच भारतीय पेटंट असल्याची माहिती देण्यात आली आहे. याशिवाय अमेरिकन केमिकल सोसायटी, रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री, युरोपियन केमिकल सोसायटी आणि एल्सेव्हियर यांसारख्या नामांकित प्रकाशनांमध्ये त्यांचे ३० आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या शोधनिबंधांचा स्कोपस सायटेशन इंडेक्स एक हजारांहून अधिक असल्याचेही सांगण्यात आले आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे सचिव मनोज वनमाळी, संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. डी. देशमुख, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. निलेश गोडे, महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी डॉ. अतुल नागपुरे यांचे अभिनंदन केले.

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संशोधनावर भर

‘ऑरगॅनिक केमिस्ट्री मॉलिक्युलर स्ट्रक्चर ॲनालिसिस डिव्हाइस’वर आधारित नवीन तंत्रज्ञान विकसित करणे ही विज्ञानाच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे. या क्षेत्रातील पुढील संशोधन सुरू असून, त्यातून मिळणारे महत्त्वपूर्ण निष्कर्ष भविष्यात नामांकित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्कोपस-इंडेक्स्ड प्रकाशनांमध्ये प्रसिद्ध करण्याचा मानस असल्याचे डॉ. अतुल सोपान नागपुरे यांनी सांगितले.

डॉ. नागपुरे यांच्या या संशोधनात्मक कामगिरीमुळे नागभीडच्या शैक्षणिक क्षेत्राची प्रतिष्ठा वाढली असून, संशोधन क्षेत्रात कार्यरत विद्यार्थी आणि नवोदित संशोधकांसाठी ही कामगिरी प्रेरणादायी ठरत आहे.

Previous Post Next Post