चंद्रपूर : महाराष्ट्र शासनाच्या वतीने अनुसुचित जमाती (एस. टी.) प्रवर्गातील उमेदवारांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग 01 डिसेंबर 2026 पासून सुरू होणार आहेत. हे वर्ग आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, पहिला माळा, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले आहेत.
सदर मार्गदर्शन वर्ग 01 डिसेंबर 2026 ते 15 मार्च 2027 या कालावधीत होणार असून वर्ग-3 व 4 पदांसाठी होणा-या स्पर्धात्मक परीक्षेची सविस्तर तयारी करून घेण्यात येईल. करीता इच्छुक उमेदवारांनी 26 नोव्हेंबर 2026 पूर्वी आवश्यक कागदपत्रांच्या (आधार कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रे, जातीचे प्रमाणपत्रे, व बँक पासबुक) छायाप्रतींसह नोंदणी फॉर्म या कार्यालयात सादर करावा. नोंद केलेल्या उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखत 27 नोव्हेंबर2026 रोजी घेण्यात येईल तर निवड यादी 30 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिध्द केली जाईल.
मार्गदर्शन वर्गामध्ये गणित, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुध्दीमत्ता चाचणी तसेच मराठी हे विषय अनुभवी मार्गदर्शकांमार्फत शिकविले जातील. निवड झालेल्या उमेदवारांना चार (04) पुस्तकांचे संच तसेच प्रतिमाह रु. 1000/- विद्यावेतन देण्यात येईल. तरी जिल्ह्यातील सर्व आदिवासी उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी रोशन शंकर गभाले यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी मनोज सिडाम (मो. 9764580986) यांच्याशी अथवा कार्यालयाशी संपर्क साधावा.
