नागभीड : समग्र शिक्षा आणि पीएम श्री योजनेंतर्गत सन २०२६-२७ साठी राबविण्यात येणाऱ्या ग्रंथालय उपक्रमात नागभीड तालुक्यातील नवखळा येथील मिनाताई माध्यमिक विद्यालयातील सहायक शिक्षिका शिल्पा ज्ञानेश्वर ठाकरे यांच्या ‘विज्ञानरंग’ या पुस्तकाची राज्यस्तरावर निवड झाली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), पुणे यांच्यामार्फत ही निवड करण्यात आली असून, या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील शालेय शिक्षण विभागातील अधिकारी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची गुणवत्ता तपासण्यासाठी राज्यस्तरीय पुस्तक परीक्षण व छाननी समितीच्या वतीने मंगळवार, २७ ऑक्टोबर २०२६ रोजी SCERT, पुणे येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील चार लेखकांची निवड झाली असून, त्यामध्ये शिल्पा ठाकरे यांच्या ‘विज्ञानरंग’ या पुस्तकाचा समावेश आहे.
शिल्पा ठाकरे यांनी शैक्षणिक क्षेत्रात विविध उल्लेखनीय कामगिरी केली आहे. याच वर्षी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल तंत्रज्ञान या विषयांतील राष्ट्रीय स्तरावरील मास्टर ट्रेनर म्हणून NCERT द्वारे त्यांची निवड झाली. त्यानुसार २१ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत IIIT, नागपूर येथे त्यांचे प्रशिक्षण झाले.
तसेच IRISE या उपक्रमांतर्गत IISER, पुणे यांच्या वतीने विज्ञान व गणित शिक्षकांसाठी राबविण्यात येणाऱ्या इनोव्हेशन चॅम्पियन्स (ICs) उपक्रमाच्या राज्यस्तरीय प्रशिक्षणासाठीही त्यांची निवड करण्यात आली. त्यानंतर १३ ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत DIET, चंद्रपूर येथे जिल्हास्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी प्रशिक्षण दिले.
ग्रंथालय उपक्रमासाठी पुस्तकाची राज्यस्तरावर झालेली निवड, राष्ट्रीय स्तरावरील मास्टर ट्रेनर म्हणून मिळालेली संधी आणि विज्ञान-गणित विषयातील नावीन्यपूर्ण उपक्रमांत केलेले योगदान यामुळे शिल्पा ठाकरे यांनी शैक्षणिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
या यशाबद्दल DIET, चंद्रपूरचे प्राचार्य डॉ. विनीत मत्ते, राजकुमार हिवारे, अधिव्याख्याता वैशाली, अमोल, नागभीड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी पालवे, संस्थेचे सचिव योगेश गोन्नाडे, सहसचिव भारती गोन्नाडे, विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रबुद्ध गेडाम, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच गावकऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या या यशामुळे शैक्षणिक क्षेत्रातून समाधान व्यक्त होत असून, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.
