चंद्रपूर : दिवाळीचा सण तोंडावर असताना आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या बल्लारपूर येथील लॉटिंग गँगच्या मजुरांना आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांची थकीत मजुरी प्राप्त झाली असून, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांची मजुरीही उपलब्ध झाली आहे. त्यामुळे अनेक महिन्यांपासून मजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या कामगारांच्या कुटुंबांना दिवाळीपूर्वी आर्थिक आधार मिळाला आहे.
बल्लारपूर येथील वाहतूक विपणन विभागांतर्गत डेपोमध्ये कार्यरत लॉटिंग गँगच्या मजुरांची मजुरी अनेक महिन्यांपासून प्रलंबित होती. त्यामुळे मजुरांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले होते. दसऱ्याचा सणही आर्थिक अडचणीत गेल्यानंतर दिवाळीचा सण कसा साजरा करायचा, असा प्रश्न मजुरांसमोर निर्माण झाला होता. अखेर आंदोलनाचा पवित्रा घेण्याच्या तयारीत असलेल्या मजुरांनी आपली व्यथा भाजपा कामगार मोर्चाचे प्रदेश महासचिव अजय दुबे यांच्याकडे मांडली.
अजय दुबे यांनी ही बाब तातडीने आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या निदर्शनास आणून दिली. मजुरांच्या कष्टाचा मोबदला वेळेत मिळणे हा त्यांचा अधिकार असल्याची भूमिका घेत आ. मुनगंटीवार यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप केला. त्यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना पत्र लिहून थकीत मजुरी तातडीने अदा करण्याची मागणी केली. तसेच वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव खंदारे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून मजुरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला.
एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीतील थकीत मजुरी तातडीने देण्यासोबतच सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांची मजुरीही उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी प्रशासनाकडे आग्रही भूमिका मांडली. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून, मजुरांच्या अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.
मजुरांच्या कष्टाचा सन्मान महत्त्वाचा!
मजुरांच्या मजुरीवरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण आणि दैनंदिन गरजा अवलंबून असतात. अशा परिस्थितीत सणासुदीच्या काळात मजुरी रखडल्याने त्यांच्या आनंदावर विरजण पडत होते. मात्र, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मजुरांच्या अडचणींची दखल घेत प्रशासकीय स्तरावर केलेल्या पाठपुराव्यामुळे कामगार कुटुंबांना दिवाळीपूर्वी मोठा दिलासा मिळाला आहे.
कष्टकऱ्यांच्या घामाचे मोल त्यांना वेळेत मिळावे आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही सणाचा आनंद घेता यावा, या भावनेतून करण्यात आलेल्या या पुढाकाराचे मजूर वर्गातून स्वागत होत आहे.
