नागभीड : नागभीड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (कृउबास) सभापतीपदी गणेश तर्वेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आमदार कीर्तीकुमार (बंटी) भांगडिया यांचे समर्थक म्हणून परिचित असलेल्या तर्वेकर यांच्या निवडीमुळे नागभीडच्या सहकार क्षेत्रात नव्या नेतृत्वाची सुरुवात झाली आहे.
कृउबास नागभीडचे सलग दुसऱ्यांदा सभापती राहिलेले अवेश पठाण यांची चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मानद सचिवपदी निवड झाल्यानंतर त्यांनी सभापतीपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी सहकार विभागाच्या वतीने निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली.
नागभीडचे सहाय्यक उपनिबंधक अवचट यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची विशेष बैठक झाली. या बैठकीत गणेश तर्वेकर यांची सभापतीपदी एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.
नगरपरिषदेसह सहकार क्षेत्रातही सक्रिय
गणेश तर्वेकर यांनी यापूर्वी नागभीड नगरपरिषदेचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. सध्या ते नगरपरिषदेचे गटनेते तथा नगरसेवक आहेत. तसेच ते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक असून विविध शैक्षणिक, धार्मिक व सामाजिक संस्थांच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही सांभाळत आहेत.
आमदार बंटी भांगडिया यांच्या हस्ते स्वागत
नवनिर्वाचित सभापती गणेश तर्वेकर यांचे आमदार कीर्तीकुमार (बंटी) भांगडिया यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मानद सचिव व निवर्तमान सभापती अवेश पठाण, भाजपचे ज्येष्ठ नेते मोरेश्वर पाटील ठिकरे, जिल्हा परिषद माजी सदस्य संजय गजपुरे, भाजपा नागभीड तालुका अध्यक्ष संतोष रडके, तळोधी मंडळ अध्यक्ष हेमंत लांजेवार, नागभीड नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. उमाजी हिरे, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष कृष्णा सहारे, विलास विखार, कृउबास उपसभापती रमेश पाटील बोरकर, सचिव सप्तेश गुप्ता यांच्यासह सर्व संचालक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणेश तर्वेकर यांच्या बिनविरोध निवडीबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या नेतृत्वाखाली नागभीड कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

