Top News

नागभीड येथे दुर्गा वाहिनीचा विदर्भ प्रांत शौर्य प्रशिक्षण वर्ग उत्साहात संपन्न

 नागभीड येथे दुर्गा वाहिनीचा विदर्भ प्रांत शौर्य प्रशिक्षण वर्ग उत्साहात संपन्न



नागभीड, प्रतिनिधी : विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनीच्या वतीने नागभीड येथील ट्विंकल इंग्लिश स्कूलमध्ये २० मे ते २७ मे २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेला विदर्भ प्रांत शौर्य प्रशिक्षण वर्ग उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या प्रशिक्षण वर्गात विदर्भातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या २६८ प्रशिक्षणार्थी दुर्गांनी सहभाग नोंदविला.


प्रशिक्षण वर्गात नियुद्ध, छुरिका, लक्षवेध, समता, योग, खेळ व अडथळा प्रशिक्षण यांसारख्या शारीरिक विषयांसह बौद्धिक व संस्कार वर्गांचे आयोजन करण्यात आले. मुलींमध्ये शारीरिक क्षमता, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि राष्ट्रभक्तीची भावना विकसित करण्यावर विशेष भर देण्यात आला. तसेच सामाजिक आव्हानांविषयी जागरूकता निर्माण करून स्वसंरक्षण व सशक्तीकरणाचे महत्त्व पटवून देण्यात आले.


यावेळी मार्गदर्शन करताना वक्त्यांनी भारतीय संस्कृतीत स्त्रीला मातृशक्ती व देवतुल्य स्थान दिले गेले असून समाजात तिच्या सन्मानाचे संरक्षण करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन केले. मुलींना शारीरिक, बौद्धिक व सांस्कृतिकदृष्ट्या सक्षम बनविणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.


वर्गाधिकारी म्हणून विदर्भ प्रांत मातृशक्ती सहसंयोजिका राधिका जाणी यांनी जबाबदारी सांभाळली. दुर्गा वाहिनी प्रांत संयोजिका भूमेश्वरी साकुरे, सहसंयोजिका कांचन जुगनाके, मुख्य शिक्षिका अनुसया यावलकर तसेच विभाग संयोजिका राणी बावनकुळे या पूर्णवेळ वर्गात उपस्थित होत्या. वर्गात २२ शिक्षिका, ७ दुर्गा प्रबंधिका, १० महिला प्रबंधिका व १२ बजरंगी कार्यकर्त्यांनी सेवाकार्य केले.


उद्घाटन सत्राला दुर्गा वाहिनी केंद्रीय सहसंयोजिका पिंकी पवार तसेच ह.भ.प. सविता खरवडे प्रमुख उपस्थित होत्या. त्यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करून आशीर्वचन दिले. वर्गाचे प्रास्ताविक प्रांत संयोजिका भूमेश्वरी साकुरे यांनी केले.


प्रशिक्षण वर्गादरम्यान क्षेत्र संघटन मंत्री अनिरुद्ध पंडीत, क्षेत्रीय अधिकारी मातृशक्ती डॉ. प्रतिभा बोथारे, प्रांत संघटन मंत्री विष्णू देशमुख, प्रांत मंत्री प्रशांत तितरे तसेच अखिल भारतीय सत्संग प्रमुख वेदक यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. वेदक यांनी घेतलेल्या सत्संगातून प्रशिक्षणार्थींना प्रेरणादायी विचारांचा लाभ झाला.

२६ मे रोजी नागभीड शहरात दुर्गा वाहिनीचे भव्य व शिस्तबद्ध पथसंचलन काढण्यात आले. भगवामय वातावरणात झालेल्या या संचलनात प्रशिक्षणार्थी दुर्गांनी आकर्षक शारीरिक प्रात्यक्षिके सादर केली. त्यानंतर श्रीराम मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले.

वर्गाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा मंत्री रोशन नवघडे, विभाग मंत्री पराग दवंडे, जिल्हाध्यक्ष वासुदेव गहाणे पाटील, मनोज हंबरडे, दीपक जोशी, राजू ठाकरे, राजू आबदेब, अखिलेश भागवत, प्रबिर चौरीकर, अशोक पिसे, विद्या कात्यायन, शरयू काळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी निवासी राहून विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या.

नागभीड प्रखंडातील नागरिक, विविध सामाजिक संस्था, दूरदूरहून आलेली कुटुंबे तसेच अनेक हितचिंतकांनी वर्गाला भेट देऊन प्रोत्साहन दिले. ट्विंकल इंग्लिश स्कूलचे संस्थापक गणेश तर्वेकर, सचिव अजय काबरा, अभिषेक जयस्वाल, संजय गजपुरे यांच्यासह सर्व सहकाऱ्यांचे विश्व हिंदू परिषद ब्रम्हपुरी जिल्ह्याच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

Previous Post Next Post