Top News

अवैध जनावर वाहतूक प्रकरणात ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त; ५ आरोपींवर गुन्हा, एकास अटक

अवैध जनावर वाहतूक प्रकरणात ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त; ५ आरोपींवर गुन्हा, एकास अटक



चंद्रपूर - उपजिल्हा प्रतिनिधी संदीप तेलंग : स्थानिक गुन्हे शाखेने अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करत २७ जनावरांसह सुमारे ₹३१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली असून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. १२ एप्रिल २०२६ रोजी पोलीस अधीक्षकांच्या आदेशान्वये चंद्रपूर शहर परिसरात पेट्रोलिंग सुरू असताना, मुखबिराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पडोली-घुग्घुस मार्गावरील दत्त मंदिराजवळ (खुटाळा) सापळा रचण्यात आला. यावेळी अशोक लेलँड कंपनीच्या ट्रकमधून अवैधरित्या जनावरांची वाहतूक होत असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी ट्रकसह २७ गोवंश (१७ गायी व १० बैल) ताब्यात घेतले. या कारवाईत एकूण ₹३१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये ट्रक (₹२० लाख), मारुती स्विफ्ट डिझायर कार (₹५ लाख), जनावरे (₹५.४० लाख) व मोबाईल फोनचा समावेश आहे.

या प्रकरणी दानिश अब्दुल हमीद कुरेशी (वय २२) याला अटक करण्यात आली असून समीर उर्फ सोहेल, सादिक कुरेशी, समीर खान मुसाविर खान, अजीम उर्फ अजु शेख तसेच ट्रक चालक व मालक यांच्याविरुद्ध पडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताब्यात घेतलेली जनावरे सुरक्षिततेच्या दृष्टीने ‘प्यार फाउंडेशन’, छोटा नागपूर (जि. चंद्रपूर) येथे सुपूर्द करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पडोली पोलीस करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पो.उपनि. विनोद भुरले, पो.उपनि. सुनील गौरकार, पोहवा सुभाष गोहोकार, सतिश अवथरे, रजनिकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, इम्रान खान, पोअं हिरालाल गुप्ता, किशोर वाकाटे, शशांक बदामवार, पोशि सुमीत बरडे तसेच सायबर शाखेचे कार्तिक खनके व राहुल पोंदे यांनी संयुक्तपणे केली.

Previous Post Next Post