आठवणींचा साज, स्वप्नांच्या वाटेवर प्रस्थान : Twinkle English School Nagbhid चा Farewell Ceremony उत्साहात
नागभीड : समिधा सेवा संस्था संचालित श्रीमती रामप्यारीदेवी आसारामजी काबरा Twinkle English School Nagbhid येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा Farewell Ceremony 2026 उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. समिधा सेवा संस्थेचे अध्यक्ष गणेश तर्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सचिव अजय काबरा यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक सादरीकरणातून शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत भावनिक निरोप दिला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सचिव अजय काबरा यांच्यासह प्राचार्या शुभांगी पोहेकर, मुख्याध्यापिका संगीता नारनवरे, प्रा. शाम पाथोडे तसेच प्रा. राजीव खोब्रागडे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी सातत्य आणि आत्मविश्वास जोपासावा : अजय काबरा
“विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत चांगले संस्कार आणि सकारात्मक विचार जोपासले पाहिजेत. सातत्यपूर्ण परिश्रम व आत्मविश्वास यांच्या जोरावर प्रत्येक विद्यार्थी मोठे यश संपादन करू शकतो,” असे प्रतिपादन अजय काबरा यांनी अध्यक्षस्थानावरून केले. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक व व्यावसायिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
प्राचार्या शुभांगी पोहेकर म्हणाल्या, “शाळेत शिकलेली मूल्ये आयुष्यभर जपावीत. शिस्त आणि मेहनत यांच्या बळावर यशाचे शिखर गाठता येते.”
मुख्याध्यापिका संगीता नारनवरे यांनी सांगितले, “शाळा ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची पायरी आहे. आत्मविश्वास आणि मेहनतीच्या बळावर प्रत्येक विद्यार्थी आपल्या क्षेत्रात यशस्वी होईल.”
प्रा. शाम पाथोडे यांनी मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी ध्येय निश्चित करून सातत्याने प्रयत्न करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. “अपयश हेच पुढील यशाची दिशा दाखवते,” असे त्यांनी नमूद केले.
प्रा. राजीव खोब्रागडे यांनी विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानासोबत संस्कार आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव असणे आवश्यक असल्याचे सांगितले. शिस्त आणि प्रामाणिकपणा हे यशस्वी आयुष्याचे आधार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी अनुभवकथन करत शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्कूल हेड गर्ल कू. झेहनब साबरी व येलो ग्रुप लीडर कू. राधिका गावंडे यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन कू. तन्वी मसराम यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.
