भद्रावती | तालुका प्रतिनिधी - सुनील दैदावार : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई यांच्या जिल्हा शाखा चंद्रपूर व तालुका शाखा भद्रावती यांच्या वतीने जिल्हा व तालुका २०२६ पत्रकार दिनदर्शिकेचे विमोचन करण्यात आले. वरोरा, भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार करण संजय देवतळे यांच्या हस्ते दिनदर्शिका प्रकाशित झाली.
पत्रकार संघाकडून दरवर्षी जिल्हा व तालुक्याची उपयुक्त माहिती एकत्र करून दिनदर्शिका प्रसिद्ध केली जाते. यावर्षीच्या २०२६ दिनदर्शिकेत जिल्हा व तालुका पत्रकार संघाची रचना, पदाधिकारी, संपर्क क्रमांक, महत्त्वाची शासकीय कार्यालये, राष्ट्रीय व सामाजिक महत्त्वाचे दिवस तसेच पत्रकारांसाठी आवश्यक माहितीचा समावेश करण्यात आला आहे.
यावेळी आमदार देवतळे यांनी पत्रकारांच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. जनतेचे प्रश्न मांडणे व प्रशासनापर्यंत पोहोचवणे हे काम पत्रकार सातत्याने करत असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार संघाच्या उपक्रमांना पुढील काळातही सहकार्य राहील, असे त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी जिल्हा व तालुका पातळीवरील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार संघाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांची माहिती देण्यात आली. २०२६ दिनदर्शिका पत्रकारांच्या दैनंदिन कामकाजात उपयुक्त ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
