आदर्श स्मार्ट ग्रामपंचायत कळमनाला वेडली ग्रामस्थांची अभ्यासपूर्ण भेट.....सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या विकास मॉडेलचे सर्वत्र कौतुक.
राजुरा : मनोज श्रीहरी गोरे - कळमना हे गाव आज स्वच्छता, पर्यावरणपूरक उपक्रम आणि नाविन्यपूर्ण ग्रामविकासामुळे आदर्श स्मार्ट गाव म्हणून ओळखले जात आहे. याच विकास मॉडेलचा अभ्यास करण्यासाठी वेडली गावातील ग्रामस्थांनी कळमना ग्रामपंचायतीस भेट दिली. कळमना येथील आदर्श स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई यांनी राबविलेल्या विविध विकासकामांचे वेडली ग्रामस्थांनी मुक्तकंठाने कौतुक केले.
कळमना येथील विकास मॉडेल आम्ही आमच्या गावातही राबविणार आहोत असे प्रतिपादन वेडली येथील पोलीस पाटील श्री. टोंगे यांनी केले. कळमना गावाने जिल्हा नव्हे तर राज्यस्तरावर मान-सन्मान मिळवून दिला असून, या गावाला राज्यभरातून विविध मान्यवर आणि ग्रामस्थ अभ्यासभेटी देत आहेत.
सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या दूरदृष्टीतून, नियोजनबद्ध कार्यपद्धतीतून आणि ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून कळमना हे गाव सर्वांगीण विकासाचे उत्तम उदाहरण ठरत आहे. सरपंच आणि स्थानिक नेतृत्वाने सकारात्मक ध्येय ठेवून सुजाण नागरिकांना सोबत घेत कार्य केले, तर कोणतेही गाव आदर्श गाव बनू शकते, हा संदेश कळमना गावाने दिला आहे.
या विकासप्रक्रियेत समस्त ग्रामस्थांचे सहकार्य लाभल्याने कळमना गाव आज स्वच्छ, सुंदर, निर्मळ व प्रगत झाले आहे. अशीच सातत्यपूर्ण प्रगती पुढेही सुरू राहावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.
या प्रसंगी सरपंच नंदकिशोर वाढई, तमुस अध्यक्ष निलेश वाढई, उपसरपंच कौशल्या मनोहर कावळे, ग्रा प सदस्य सुनीता उमाटे, प्रभाकर साळवे (अध्यक्ष, हनुमान मंदिर देवस्थान कमिटी), कवडू पाटील गौरकार (अध्यक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय), लोहे सर (मुख्याध्यापक), वेडली येथील गुरुदेव सेवा मंडळ, ज्येष्ठ महिला ‘मायेची सावली’ मंडळ, सामाजिक कार्यकर्ते तसेच कळमना येथील समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकच ध्यास—कळमना गावाचा सर्वांगीण विकास. या उदात्त हेतूने प्रेरित होऊन केलेल्या कार्यातून कळमना आदर्श स्मार्ट गाव झाले, याचा अभिमान आणि आनंद वाटतो. - सरपंच नंदकिशोर वाढई.
