प्रदेशाध्यक्षांची यादी बदलणाऱ्यांवर कारवाई; चंद्रपूर भाजपमध्ये मोठा भूकंप
शिस्तीचा पक्ष म्हणवणाऱ्या भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उघड
निष्ठावंतांचा विजय! शहराध्यक्ष हटताच कार्यकर्त्यांचा जल्लोष
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये सुरू असलेली अंतर्गत अस्वस्थता अखेर उघड झाली आहे. उमेदवार निवड प्रक्रियेत शिस्तभंग झाल्याचा ठपका ठेवत पक्ष नेतृत्वाने चंद्रपूर महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टुवार यांना पदावरून हटवण्याचा निर्णायक निर्णय घेतला आहे. या कारवाईमुळे भाजपच्या स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे.
पक्ष प्रदेशाध्यक्षांनी महापालिका निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या अधिकृत उमेदवार यादीत अनधिकृत बदल झाल्याचे पक्षाच्या निदर्शनास आले होते. या यादीत शहराध्यक्षांच्या हस्तक्षेपामुळे अनेक नावे बदलल्याची चर्चा पक्षांतर्गत सुरू होती. या प्रकरणाला गंभीर स्वरूप प्राप्त झाल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी तातडीने कारवाई करत संबंधितांना जबाबदार धरले.
सुमारे वर्षभरापूर्वी कासनगोट्टुवार यांची महानगर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यांच्या कार्यकाळात संघटनात्मक पातळीवर नाराजी वाढल्याचे चित्र होते. निर्णयप्रक्रियेत एकतर्फी भूमिका घेतल्याच्या तक्रारी अनेकदा वरिष्ठांकडे पोहोचल्याचे समजते.
दरम्यान, शहराध्यक्ष पदावरून हटवण्यात आल्याची माहिती समजताच शहरातील काही भागांमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त करत जल्लोष केला. पक्षशिस्त जपली गेल्याची भावना यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
महानगरपालिका निवडणूक तोंडावर असताना घेतलेल्या या निर्णयामुळे चंद्रपूर भाजपमध्ये नव्या नेतृत्वाची निवड आणि पुढील रणनीती काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
