मूल येथे नायलॉन मांज्यावर मोठी धाड; अवैध साठा जप्त, एक जण गजाआड
चंद्रपूर – प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने दिलेला धडाका कायम ठेवत दि. १० डिसेंबर २०२५ रोजी महत्त्वाची कारवाई केली. स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन मूल हद्दीत छापा टाकून साहिल गणेश नागोसे (२० वर्षे), रा. नागोसे मोहल्ला, मूल याच्या घरातून मोठ्या प्रमाणात नायलॉन मांज्याचा साठा जप्त केला.
पथकाने पंचांच्या उपस्थितीत घेतलेल्या झडतीदरम्यान पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या, मानवी जीवितास व पर्यावरणास अत्यंत धोकादायक असलेल्या प्रतिबंधित नायलॉन मांज्याच्या एकूण ३४ प्लास्टिक चक्री हस्तगत करण्यात आल्या. या अवैध साठ्याची किंमत सुमारे ₹17,000 इतकी असल्याचे सांगितले जाते.
चौकशीत आरोपी नागोसे याने हा मांजा चंद्रपूर येथील पीयूष नावाच्या व्यक्तीकडून मिळाल्याचे सांगितले. प्रतिबंधित वस्तू ताब्यात बाळगणे तसेच पुरविणे हा गंभीर गुन्हा ठरत असल्याने संबंधितांवर कलम 223, 292, 336, 56 BNS तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियमातील कलम 5 व 15 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.जप्त केलेला माल आणि आरोपी याला पुढील कार्यवाहीसाठी मूल पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.स्थानीय गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी यापुढेही अशी अवैध विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
