Top News

आदर्श गाव कळमना येथे संत परंपरेचा जागर : ह.भ.प. सुधाकर महाराज कावडकर यांचे भारूडांतून समाजप्रबोधन.

आदर्श गाव कळमना येथे संत परंपरेचा जागर :  ह.भ.प. सुधाकर महाराज कावडकर यांचे भारूडांतून समाजप्रबोधन. 


राजुरा | उपजिल्हा प्रतिनिधी |मनोज श्रीहरी गोरे : आदर्श जिल्हा स्मार्ट ग्राम म्हणून ओळख असलेल्या कळमना या गावात समाजप्रबोधनाचा अनोखा मेळा रंगला. संत परंपरेचा वारसा जपत ह.भ.प. सुधाकर महाराज कावडकर यांनी आपल्या प्रभावी वाणीने आणि ओघवत्या सादरीकरणातून संत एकनाथ महाराजांनी रचलेल्या भारुडांद्वारे समाजजागृतीचा दीप प्रज्वलित केला. यावेळी गावातील संपूर्ण वातावरण भक्तिरसाने आणि समाजप्रबोधनाच्या संदेशाने भारले गेले होते.

       कळमना हे गाव शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी प्रसिद्ध आहे. या गावात नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. त्यातच एक नवा अध्याय म्हणून सुधाकर महाराजांच्या भारुड कार्यक्रमाने गावकऱ्यांना अध्यात्म आणि समाजभानाचा संगम अनुभवायला मिळाला.

      कार्यक्रमादरम्यान महाराज म्हणाले, संत एकनाथ महाराजांनी भारुडांमधून समाजप्रबोधनाचा संदेश दिला. त्या संतपरंपरेतील सेवक म्हणून मला या भारुड रुपी सेवेच्या माध्यमातून समाजाला जागवण्याचे सौभाग्य लाभले. कळमना सारख्या आदर्श गावात भारुड सादर करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी सरपंच नंदकिशोर वाढई व समस्त गावकऱ्यांचा आभारी आहे. 

       या प्रसंगी आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई, पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे, तंटामुक्त समिती अध्यक्ष निलेश वाढई, गुरुदेव सेवा मंडळ अध्यक्ष महादेव ताजने, हनुमान मंदिर अध्यक्ष प्रभाकर साळवे, मंगेश ताजने, डॉ. लटारी बल्की, कवडू  पिंगे, विठ्ठल  वाढई, सुरेश गौरकार, कवडू गौरकार, गणपती कुकडे, शंकर गेडाम, शकुंतला पिंगे, कुंदा बल्की, गिरजाबाई वाढई, संगीता ताजने, पुष्पा पिंगे, नानेबाई इददे व समस्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post