वनसडी येथे हवा महामार्गावर स्कायवॉकर
प्रवास असुरक्षित ; रस्ता ओलांडणे ठरतेय जिकिरीचे
कोरपना : रोशन आस्वले (ता.प्र.) - राजुरा आदिलाबाद राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे सद्यस्थितीत काम सुरू आहे. महामार्ग चौपदरी झाल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूकडून रस्ता ओलांडताना ग्रामस्थाना अडचणी निर्माण होत आहे. यात अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या दृष्टीने कोरपना तालुक्यातील वनसडी येथे स्काय वाक उभारून पादाचार्यांना जाण्या येण्याची व्यवस्था करावी अशी मागणी होते आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील वनसडी हे मोठ्या बाजारपेठेचे गाव आहे. त्यामुळे येथे नेहमीच मोठ्या प्रमाणात रेलचेल असते. या ठिकाणी भरधाव वाहने धावत असल्याने पादचार्यांना रस्ता ओलांडताना असुरक्षित प्रवास करावा लागतो आहे. तसेच रस्त्याच्या एका बाजूला तलाठी कार्यालय, बँक ऑफ इंडिया , बाजारपेठ तर दुसऱ्या बाजूला ग्रामपंचायत , वन विभागाचे कार्यालय , आयुर्वेदिक दवाखाना, शाळा , जुने गाव , बाजार आदी महत्वपूर्ण बाबी आहे.
त्यामुळे दैनंदिन रस्ता ग्रामस्थांना ओलांडावा लागतो. परंतु आता प्रवास मार्ग पूर्वीसारखा सुरक्षित नाही. त्यामुळे वृद्ध मंडळी, लहान मूल , पुरुष , महिला मंडळीच्या दृष्टीने रस्त्याच्या मध्यंतरी स्कायवॉकर उभारण्यात यावा . जेणेकरून रस्ता ओलांडणे सुरक्षित रित्या होईल. या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व महामार्ग कन्ट्रक्शन कंपनी ने ही व्यवस्था करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
