विदर्भवादी 15 ऑगस्टला करणार अन्नत्याग...
आंदोलनाच्या पाचव्या दिवशी केले 'शीर्षासन', ठराव झाले पारित.....
विदर्भ माझा न्युज 24 - नागपूर
विदर्भाचे स्वतंत्र राज्य व्हावे, कोरोना काळातील वीज बिल माफ व्हावे आणि पेट्रोलियम पदार्थांची दरवाढ मागे घ्यावी, या मागण्यांसाठी विदर्भवाद्यांनी ठिय्या आंदोलन केले, स्वत:ला अटक करवून घेतली, मुंडण केले, अर्धनग्न झाले तरी सरकारचा आडमुठेपणा कायम आहे. या नाकर्त्या सरकारवर रोष अधिक तीव्र करण्यासाठी आता विदर्भवादी स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्ट रोजी अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. त्यासंदर्भातील ठराव आज विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे पारित करण्यात आला.
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते अॅड. वामनराव चटप, राम नेवले, महिला आघाडी अध्यक्ष रंजना मामर्डे, युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर यांच्या नेतृत्वात विविध मागण्यांसाठी ऑगस्ट क्रांतिदिनापासून इतवारीतील शहीद चौकात असलेल्या विदर्भ चंडिका मंदिराच्या सभामंडपात ठिय्या आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी सर्व विदर्भवाद्यांना अटक करण्यात आली व त्यानंतर सायंकाळी सोडून देण्यात आले होते. आज पाचव्या दिवशी सकाळी ठरल्याप्रमाणे विदर्भवाद्यांना सकाळी परिसरात गर्दी करायला सुरुवात केली. आज येथे नरेश निमजे या कार्यकर्त्याने 29 मिनिटे शीर्षासन केले तर ऋषभ वानखेडे, सुदाम राठोड यांनीही शीर्षासन आंदोलन सहभाग नोंदवला.
'आमच्या तीनही मागण्या पूर्ण करण्यात शासन पूर्णत: अपयशी ठरले असल्याने 'या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय' या न्यायानुसार आम्ही शीर्षासन करुन शासनाची विद्यमान स्थिती जनतेसमोर मांडत असल्याचे राम नेवले यांनी सांगितले.
१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरुच राहणार असून त्यादिवशी संपूर्ण विदर्भातून कार्यकर्ते येतील आणि एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यादिवशी सायंकाळी ५ वाजता आंदोलनाचा पहिला टप्पा संपेल आणि त्यानंतर पुढील आंदोलनाची रुपरेषा निश्चित करण्यात येईल, असे राम नेवले यांनी सांगितले. कोरोना काळातील वीज बिल सरकारने त्वरित माफ करावे व वाढीव वीज दर कमी करावे अन्यथा उर्जामंत्र्यांना विदर्भात फिरणे बंद करू, असा इशारा राम नेवले यांनी दिला.
केंद्र शासनाने साप हा वन्यजीव असल्याचे म्हटले असून त्याला पकडणे आणि मारणे हा गुन्हा आहे. त्यासाठी दोन वर्षाची शिक्षेची तरतुद आहे. म्हणून सर्पदंशाने गतप्राण झालेल्यांचा वारसांना इतर वन्य प्राण्यांच्याबाबतीत जशी आर्थिक मदत मिळते तशी आर्थिक मदत द्यावी, असे वामनराव चटप यांनी आवाहन केले.
आंदोलनकर्त्यांना आज माधवराव गावंडे, गजानन अहमदाबादकर, उदयभान लांडगे, शैलेश धर्माधिकारी, ईश्वर सहारे, गौतम कामडे, सुनील तिवारी, पराग गुंडेवार, सुनील वडस्कर, प्रीती दीडमुठे, अशोक पटले व प्रशांत जयकुमार, जया चातुरकर, विणा भोयर, रवींद्र भामोडे, प्रदीप सिरसकर, तरिश दुरूगकर, प्रशांत तागडे, सुदाम राठोड, डॉ. रमेश गजबे, गोविंदराव चिंतावार, निखिल भायणे यांचीही भाषणे झाली.
वीज बिलांची आज होळी
शुक्रवारच्या आंदोलनानंतर विदर्भवादी नेते व कार्यकर्त्यांची कार्यसमितीची बैठक झाली. त्यात चार ठराव पारित करण्यात आले. यात विदर्भाच्या आंदोलनात आजवर शहीद झालेल्या कार्यकर्त्यांचे एक स्मारक तयार करण्याची समितीची इच्छा असून त्यासाठी महापालिकेने जागा उपलब्ध करुन द्यावी असा निर्णय घेण्यात आला. १४ ऑगस्ट रोजी आंदोलनस्थळी वाढीव वीज बिलांची होळी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही मागणी पूर्ण करीत शासनाने बिल न भरलेल्या ग्राहकांचे कनेक्शन कापणे बंद करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शासन व ऊर्जामंत्र्यांना याद्वारे देण्यात आला.
असे आहेत ठराव
- विदर्भ राज्यासाठी शहीद झालेल्याचे 'सामोहिक हुतात्मा स्मारक' उभारणार.
- 14 ऑगस्टला वीज बिलांची होळी
- 15 ऑगस्टला संपूर्ण विदर्भातून आलेल्या कार्यकर्त्यांचे एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन
- साप चावल्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्या शेतकत-यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्या.

