राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली.
विदर्भ माझा न्युज 24 - बारामती :-
उजनीच्या पाणी प्रश्नावरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंदबाग या निवासस्थानासमोर आंदोलन करणाऱ्या दोघांना पोलिसांनी सकाळी ताब्यात घेतले आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता गोविंदबागेसमोर पोलिसांनी बंदोबस्त वाढवीला आहे.
आज सकाळी गोविंदबागेसमोर उजनीच्या पाणी प्रश्नावर आंदोलनासाठी निघालेल्या नागेश भारत वनकळसे (रा. मोहोळ, जि. सोलापूर) व महेश दामोदर पवार (रा. कोथाळे, ता. मोहोळ, जि. सोलापूर) यांना आज तालुका पोलिसांनी माळेगावमध्येच ताब्यात घेतले. गोविंदबागेसमोर आंदोलन होऊ नये या उद्देशाने पोलिसांनी येथील सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.
गेल्या काही दिवसांपासून उजनीच्या पाण्याचा प्रश्न पेटला असून सोलापूर व पुणे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये वादाच्या ठिणग्या पेटत आहेत. या प्रकरणी लक्ष वेधण्याच्या उद्देशाने आज हे आंदोलन करण्याचा आंदोलकांचा प्रयत्न होता, मात्र पोलिसांनी त्यांना अगोदरच ताब्यात घेतले. अजित पवार यांच्या सहयोग सोसायटीतील निवासस्थानाबाहेरही आज पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


