अखेर नागपूरच्या पोलीस उपनिरीक्षक संतोष खांडेकर वर कारवाई...
महिलेची भाजी रस्त्यावर फेकणं पडल महागात....
विदर्भ माझा न्युज 24 - नागपूर :-
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागपुरात लॉकडाऊन लावण्यात आला. पण लॉकडाऊनच्या काळात उदरनिर्वाहासाठी भाजी विक्री करणाऱ्या महिलेची भाजी एका पोलीस उपनिरीक्षकाने चक्क रस्त्यावर फेकून दिल्याचा एक व्हिडीयो चांगलाच व्हायरल झाला होता. सोशल मीडियावर संबंधित पोलिसावर कारवाईची मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात येत होती. या घटनेची दखल ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना घ्यावी लागली. अखेर पोलीस उपनिरीक्षक संतोष खांडेकर यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यांचं दोन वर्षाचं इन्क्रिमेंट न देण्याचा आदेश काढण्यात आलाय.
नागपूरच्या जरीपटका भागातील कुशी नगर परिसरात एक महिला भाजी विक्री करत होती. खाकी वर्दीतील अधिकाराचा गैरवापर करत पोलीस उपनिरीक्षक संतोष खांडेकर यांनी त्या महिलेची सगळी भाजी आणि बाकी सामान रस्त्यावर फेकून दिलं. तिथल्या रहिवाशांनी संबंधित अधिकाऱ्याची ही कृती मोबाईलमध्ये कैद केली आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या. अनेकांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी केली. समाजाच्या दबावापोटी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना या प्रकरणाची दखल घ्यावी लागली.
