Top News

बल्लारपूरच्या सुरक्षेसाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांची मागणी; मुख्यमंत्र्यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश

 

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अत्याधुनिक सीसीटीव्ही सर्व्हेलन्स प्रणाली उभारण्याची मागणी




चंद्रपूर : बल्लारपूर शहरातील नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शहरात अत्याधुनिक सीसीटीव्ही सर्व्हेलन्स प्रणाली उभारण्याची मागणी केली आहे. या प्रणालीसाठी तांत्रिक मान्यता देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची विनंती त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी अपर मुख्य सचिव (गृह) यांना ‘अ’ प्रमाणे तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

बल्लारपूर शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा, संवेदनशील ठिकाणे तसेच प्रवेश व निर्गमन मार्गांवर अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची आवश्यकता आमदार मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. औद्योगिक व व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या बल्लारपूरमध्ये गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध घालणे, संशयास्पद हालचालींवर नजर ठेवणे आणि पोलिसांच्या तपासकार्यात आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेणे, हा या मागणीमागील उद्देश आहे.

या संदर्भात चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षकांनी सविस्तर प्रस्ताव गृह विभागाकडे सादर केला आहे. प्रस्तावित प्रणालीअंतर्गत शहरातील प्रमुख व संवेदनशील ठिकाणी उच्चक्षमतेचे सीसीटीव्ही कॅमेरे, आधुनिक नियंत्रण कक्ष, रेकॉर्डिंग व स्टोरेज व्यवस्था, नेटवर्किंग आणि अखंडित वीजपुरवठ्यासाठी आवश्यक सुविधा उभारण्याचे नियोजन आहे.

या यंत्रणेमुळे संशयास्पद हालचालींवर प्रभावी नजर ठेवणे, गुन्ह्यांच्या तपासासाठी दृश्य पुरावे उपलब्ध करणे आणि शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यास मदत होणार आहे. प्रस्तावाला तांत्रिक मान्यता मिळून आवश्यक निधी उपलब्ध झाल्यास बल्लारपूर शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे.

Previous Post Next Post