Top News

विद्यार्थी सर्वांगीण विकासाला दिशा देणारे हे व्यासपीठ : स्नेहल लाड

अमृतमहोत्सवी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे यशस्वी आयोजन





नागभीड : जनता शिक्षण संस्था, नागभीडच्या शिक्षण क्षेत्रातील अविरत सेवेची ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने संस्थेच्या वतीने अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. शैक्षणिक सत्र २०२५-२६ पासून सुरू झालेल्या या अमृत महोत्सवी वर्षात विद्यार्थी व समाजोपयोगी विविध उपक्रम राबविण्याचा संस्थेचा मानस आहे. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून तालुक्यातील विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या वक्तृत्व शैलीला चालना देणे तसेच आपले विचार प्रभावीपणे मांडण्याचे धाडस विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे, या उद्देशाने १६ सप्टेंबर २०२६ रोजी जनता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, नागभीड येथे अमृतमहोत्सवी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. 


या स्पर्धेचे आयोजन इयत्ता पाचवी ते सातवी, इयत्ता आठवी ते दहावी आणि इयत्ता अकरावी ते बारावी अशा तीन गटांमध्ये करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व विचारशक्तीला चालना देणारे विषय स्पर्धेसाठी देण्यात आले. यामध्ये ‘शालेय जीवनात शिक्षकांचे महत्त्व’, ‘माझ्या स्वप्नातील भारत’ आणि ‘एआय आणि युवा पिढी’ या विषयांचा समावेश होता.



स्पर्धेचे उद्घाटन गटविकास अधिकारी स्नेहल लाड यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष डॉ. अमीर धमाणी होते. प्रमुख अतिथी म्हणून गोंडवन विकास संस्थेचे सचिव रवींद्र जनवार, जनता शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अतुल चिल्लूरे, चक्रधर रोहणकर, सचिव डॉ. रवींद्र कावळे, सहसचिव रवींद्र समर्थ, प्राचार्य एस. टी. कोरे, आर. पी. मेश्राम आणि पर्यवेक्षक सतीश नरडंगे उपस्थित होते. 



यावेळी स्नेहल लाड यांनी विद्यार्थ्यांना आपले विचार प्रभावीपणे मांडण्यासाठी अशा स्पर्धांच्या माध्यमातून हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अशा उपक्रमांचे महत्त्व असून तालुकास्तरावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करणे ही उल्लेखनीय बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. या उपक्रमासाठी त्यांनी जनता शिक्षण संस्थेचे अभिनंदन केले. 



स्पर्धेचे परीक्षण डॉ. निकिता मिश्रा, डॉ. निलेश गोडे, बी. के. चुटे, नलू मेश्राम, दीप्ती मडावी आणि सुरेश मस्के यांनी केले.

तीनही गटांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. गट ‘अ’ मध्ये पूर्वी पारखी हिने प्रथम, वैष्णवी मेश्राम हिने द्वितीय तर अपूर्वा शिवणकर हिने तृतीय क्रमांक मिळविला. गट ‘ब’ मध्ये हिमानी लटारे हिने प्रथम, ज्ञानीका हेमणे हिने द्वितीय तर सलोनी खोंडे हिने तृतीय क्रमांक मिळविला. गट ‘क’ मध्ये किरण बनकर हिने प्रथम, श्रेया लटारे हिने द्वितीय तर कपिल सामुसाकडे याने तृतीय क्रमांक मिळविला.



विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्पर्धा प्रमुख प्रा. मंगेश गुरपूडे आणि सतीश मेश्राम यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच राजेंद्र मेश्राम, बालाजी चौधरी, मिलिंद संगमवार, अंकुश मातेरे, रवींद्र वांढरे, आशिष राहूड, नरेंद्र समर्थ, विनोद धकाते, संगीता मत्ते, अश्विनी सोनवणे, चारुलता पडोळे आणि लिनता टिकले यांनी विशेष सहकार्य केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर सयाम आणि मिलिंद संगमवार यांनी केले, तर मिलिंद सेलोटे यांनी आभार मानले.

Previous Post Next Post