घोडपेठ येथे एस.टी. बस न थांबत असल्याने प्रवाशांचे हाल

५ नोव्हेंबर २०२५ च्या अधिकृत आदेशाचे सर्रास उल्लंघन; लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा



भद्रावती | प्रतिनिधी - सुनील दैदावार : चंद्रपूर–नागपूर राष्ट्रीय मार्गावरील भद्रावती तालुक्यातील घोडपेठ बसथांबा येथे सर्वसामान्य व सुपर एस.टी. बसेस थांबविण्याबाबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, चंद्रपूर आगाराकडून दिनांक ५ नोव्हेंबर २०२५ रोजी अधिकृत आदेश निर्गमित करण्यात आले होते. मात्र या आदेशाचे सर्रास उल्लंघन होत असून अनेक एस.टी. बस चालक व वाहक घोडपेठ येथे बस न थांबविता पुढे जात असल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.

आदेशानुसार घोडपेठ येथे प्रवासी व विद्यार्थ्यांची सुरक्षित चढ-उतार करण्याचे स्पष्ट निर्देश असतानाही प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. याचा फटका विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच दैनंदिन प्रवास करणाऱ्या कामगारांना बसत असून वेळेवर बस न मिळाल्याने प्रवाशांना जीव धोक्यात घालून रस्त्यावर उभे राहावे लागत आहे.

या गंभीर समस्येबाबत इंजिनियर जगदीश लवाडिया यांच्या नेतृत्वाखाली संबंधित विभागाला निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करून घोडपेठ येथे सर्व एस.टी. बसेस नियमित थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी मंजुषा खारकर, वर्षा खारकर, सुनीता भेंडाळे, शंकर खारकर, गीतेश भोयर, विशाल धारावत यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक ग्रामस्थ व प्रवासी उपस्थित होते.