कंत्राटदार गेला खड्ड्यात..! ४ महिन्यांच्या वेतनासाठी सुरज ठाकरे यांचा वेकोलीला थेट अल्टिमेटम

कंत्राटदार गेला खड्ड्यात..!  ४ महिन्यांच्या वेतनासाठी सुरज ठाकरे यांचा वेकोलीला थेट अल्टिमेटम



राजुरा -  वेकोली बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत कार्यरत ए. आर. कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराकडून वाहन चालक, सुपरवायझर, क्रशर ऑपरेटर व हेल्पर पदांवर २४ तास काम करणाऱ्या कामगारांचे सप्टेंबर ते डिसेंबर २०२५ या चार महिन्यांचे वेतन अद्याप अदा करण्यात आलेले नाही. वारंवार पाठपुरावा करूनही ठेकेदाराकडून टाळाटाळ सुरू असल्याने संबंधित कामगार व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.

या गंभीर परिस्थितीमुळे संतप्त झालेल्या कामगारांनी जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरज ठाकरे यांच्याकडे तक्रार अर्ज सादर करत आपली व्यथा मांडली. तक्रारीची दखल घेत आज १२ जानेवारी २०२६ रोजी संघटनेच्या नेतृत्वाखाली मुख्य प्रबंधक, वेकोली बल्लारपूर क्षेत्र, राजुरा यांच्या कार्यालयात संघटनेचे पदाधिकारी व कामगारांनी निवेदन दिले.


निवेदनात प्रिन्सिपल एम्प्लॉयर म्हणून वेकोलीची जबाबदारी स्पष्ट करत चार महिन्यांचे थकीत वेतन व्याजासह तात्काळ अदा करण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा समस्त कामगार कुटुंबासह वेकोली कार्यालयासमोर उपोषण अथवा तीव्र आंदोलन छेडण्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

यावेळी सुरज ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया देत, *“कंत्राटदार गेला खड्ड्यात, पण कामगारांचे चार महिन्यांचे वेतन वेकोलीने तात्काळ द्यावे,”* अशी ठाम भूमिका मांडली.

निवेदन सादर करताना जय भवानी कामगार संघटनेचे सचिव राहुल चव्हान, तालुका अध्यक्ष संतोष मेश्राम, युवा शहराध्यक्ष रोहीत बत्ताशंकर यांच्यासह निखिल बजाईत, आकाश आईटलावार तसेच विक्रम रंगारी, विनोद केसकर, चंदन निषाद, निलेश भोयर, रामेश्वर सूर्यवंशी, राजेंद्र भगत, मनोज वर्मा, मंगेश टेकाम, मनोज केसकर, रवीकांत पिपंळकर, पंकज गुमल्यावर, राकेश रामीलावार, रुहाब अहमद, अमोल बुरडकर, संतोष तुरनाकर, शिवप्रसाद वर्मा, प्रतीक मानकर, संतोष लांडे, शुभम ठाकरे, राहुल लांडे आदी मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते.