काँग्रेसमध्ये अंतर्गत असंतोष उफाळला!
स्वीकृत सदस्यांच्या चर्चेवर प्रमोद चौधरींचा थेट ‘सोशल मीडिया वार’ – विश्वासघाताचा आरोप
नागभीड : नागभीड नगरपरिषदेतील उपाध्यक्षपद व स्वीकृत सदस्यांच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी उघडपणे समोर येऊ लागली आहे. या राजकीय घडामोडींना आणखी धार देत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद चौधरी यांनी थेट सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांच्या पोस्टमुळे पक्षांतर्गत वर्तुळात खळबळ उडाली असून, ही प्रतिक्रिया सध्याच्या स्वीकृत सदस्यांच्या चर्चेशी थेट संबंधित मानली जात आहे.
प्रमोद चौधरी यांनी आपल्या पोस्टमध्ये कोणाचेही नाव न घेता पक्षातील काही नेत्यांवर *विश्वासघाताचा* गंभीर आरोप केला आहे. कार्यकर्ते पाच वर्षे रस्त्यावर लढतात, संघर्ष करतात; मात्र निवडणुकीच्या वेळी पक्षात फारसे न दिसणाऱ्या व्यक्तींना तिकीट दिले जाते, ते पराभूत होतात आणि नंतर त्यांनाच स्वीकृत सदस्य म्हणून संधी दिली जाते, असा रोखठोक आरोप त्यांनी केला आहे. मागील पंचवार्षिक काळातही असाच प्रकार झाल्याचे नमूद करत त्यांनी यालाच “काँग्रेसची संस्कृती” म्हणत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे, “एकच नगरसेवक पराभूत झाला नाही, उर्वरित सर्व पराभूत झाले; तरीही संधी त्यालाच का?” असा सवाल उपस्थित करत चौधरी यांनी आता कोणत्याही नेत्यावर विश्वास ठेवणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
सोशल मीडिया वरील थेट पोस्ट :
> ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच विश्वासघात केला अशा नेता वर कधीच विश्वास बसणार नाही माझ्यावर विश्वासघात झाला यानंतर कोणत्याच नेत्यावर विश्वास ठेवू नका आपन यांच्या साठी लडून झगडून विरोधात सोबत विरोध करतो पण नेते जे पक्षात संघटनेत पाच वर्षे दिसत नाहीत तिकीट देऊन ते पडतात व त्यांना स्वीकृत सदस्य घेतात हे मागच्या पंचवार्षिक हाच प्रकार झाला आहे हे काँग्रेसची संस्कृती आहे हो एकच नगरसेवक पडला नाही बाकी इतर नगरसेवक पडले त्यालाच संधी का ? आता नेत्याच्या विश्वास ठेवायचा नाही !
> प्रमोद चौधरी, तालुकाध्यक्ष, काँग्रेस कमिटी, नागभीड
दरम्यान, १३ जानेवारी रोजी होणाऱ्या उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यांच्या निवडीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले असताना, प्रमोद चौधरींच्या या पोस्टमुळे काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण अधिकच तापण्याची चिन्हे दिसत आहेत. पक्षश्रेष्ठी या नाराजीची दखल घेणार का, की ही असंतोषाची ठिणगी आणखी भडकणार, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.
