मद्यप्रेमींना मोठा झटका! चंद्रपूर येथे दारूबंदी

मद्यप्रेमींना मोठा झटका! चंद्रपूर येथे दारूबंदी




चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रिया शांततेत, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व प्रकारच्या किरकोळ मद्य, बिअर व ताडी विक्री अनुज्ञप्त्या तीन दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले आहेत.

राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, चंद्रपूर शहर महानगरपालिकेसाठी दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान व दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. त्या अनुषंगाने मतदानाच्या आदल्या दिवशी, मतदानाच्या दिवशी तसेच मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यानुसार दिनांक १४ जानेवारी २०२६ (बुधवार) – मतदानाच्या आदल्या दिवशी, १५ जानेवारी २०२६ (गुरुवार) – मतदानाच्या दिवशी आणि १६ जानेवारी २०२६ (शुक्रवार) – मतमोजणीच्या दिवशी चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व सीएल-३, एफएल-२, एफएल-३ (परवाना कक्ष), एफएल-४, एफएल/बीआर-२, टीडी-१ (ताडी) तसेच इतर सर्व किरकोळ मद्य, बिअर व ताडी विक्री अनुज्ञप्त्या संपूर्ण दिवस बंद राहतील.

महाराष्ट्र देशी दारू नियम १९७३, महाराष्ट्र विदेशी मद्य नियम १९६९ तसेच महाराष्ट्र ताडी दुकाने नियम १९६८ अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त अधिकारानुसार हा आदेश जारी करण्यात आला आहे. सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.