नागभीड नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी काँग्रेसचे प्रतिक भसिन, स्वीकृत सदस्य म्हणून काँग्रेसचे दिनेश गावंडे; भाजपकडून प्रा. डॉ. अमीर धमानी यांची एन्ट्री
नागभीड : नागभीड नगरपरिषदेच्या सत्ताकारणातील महत्त्वाचा टप्पा अखेर पूर्ण झाला आहे. नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी काँग्रेसचे प्रतिक भसिन यांची अधिकृत निवड करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान काँग्रेसने बहुमताच्या जोरावर उपाध्यक्षपदावर आपला दावा यशस्वीपणे कायम ठेवला.
त्याचबरोबर काँग्रेसकडून स्वीकृत सदस्य म्हणून दिनेश गावंडे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. निवडणुकीत अत्यल्प मतांनी पराभव पत्करलेल्या गावंडे यांना पक्षाने पुन्हा संधी देत नगरपरिषदेच्या कामकाजात सहभागी करून घेतले आहे.
दरम्यान, भाजपकडून स्वीकृत सदस्य म्हणून प्रा. डॉ. अमीर धमानी सर यांची निवड करण्यात आली असून, त्यांच्या निवडीमुळे भाजपच्या गोटात समाधान व्यक्त केले जात आहे. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील अनुभवाच्या जोरावर ते नगरपरिषदेच्या कामकाजात सक्रीय भूमिका बजावतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
नगराध्यक्ष स्मिता खापर्डे यांच्या नेतृत्वाखाली आता नगरपरिषदेत पूर्ण कार्यकारिणी अस्तित्वात आली असून, उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यांच्या निवडीमुळे नगरपरिषदेच्या विकासकामांना गती मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, येत्या काळात नागभीड शहराच्या विकासासाठी समन्वयाने काम होईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
