लोकसेवा मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व्याख्यानमाला, सांस्कृतिक कार्यक्रम व शोभायात्रेचे आयोजन
भद्रावती | प्रतिनिधी - सुनील दैदावार : येथील लोकसेवा मंडळाद्वारे संचालित लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपाचा तसेच लोकसेवा मंडळाचे आद्य संस्थापक अध्यक्ष स्व. निळकंठराव उपाख्य अण्णाजी गुंडावार यांच्या जयंती समारोहाचा भव्य उद्घाटन सोहळा दि. २० जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रशस्त पटांगणावर आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याचे उद्घाटन मूल–बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून लोकमत मीडिया ग्रुपचे चेअरमन तथा माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा, राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगळे, लोकसेवा मंडळाचे माजी अध्यक्ष बळवंतराव गुंडावार आणि माजी सचिव मनोहर पारधे उपस्थित राहणार आहेत. यावेळी ऐतिहासिक वस्तू संग्राहक अमित गुंडावार यांनी संकलित केलेल्या शिवकालीन व ऐतिहासिक वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार असून ही प्रदर्शनी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत खुली राहणार आहे.
दि. २० जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रफुल्ल चटकी तसेच सर्व नगरसेवकांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रकांत गुंडावार राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून वरोरा–भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे आमदार करण देवतळे, नागपूर विभागाचे शिक्षक आमदार सुधाकर अडबाले आणि चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे उपस्थित राहणार आहेत.
दि. २१ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता प्रखर विचारवंत व झी टीव्ही फेम प्रशांत ठाकरे यांचे ‘हाती ज्यांच्या शून्य होते’ हे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूर–वणी–आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर, हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार समीर कुणावार, नागपूर विभागाचे माजी शिक्षक आमदार नागो गाणार आणि रमेश धारकर उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ४.३० वाजता भारतातील विविध राज्यांच्या संस्कृतीवर आधारित ‘नृत्याविष्कार’, हास्यजत्रा, मिसाबंदीवासी व नेत्रदान करणाऱ्या कुटुंबांचा सत्कार करण्यात येणार आहे.
दि. २२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता ‘चला अगस्ती होऊ या’ या विषयावर डॉ. बाबा नंदनपवार यांचे व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक तथा भाजपाचे प्रांत संघटनमंत्री रवी भुसारी राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ४ वाजता ‘नृत्याविष्कार’ तसेच कौशल्य विकास आधारित मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यामध्ये जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण शिक्षण अधिकारी डॉ. वैभव बोनगिरवार मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भद्रावती पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश महाकाळकर आणि नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी उपस्थित राहणार आहेत. दि. २३ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता भारतीय संस्कृती दर्शन घडविणारी भव्य शोभायात्रा, दि. २४ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता लोकमान्य ज्ञानपीठ प्रस्तुत देशभक्तीपर सामूहिक नृत्य, तर दि. २५ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता बक्षीस वितरण समारंभ पार पडणार आहे. या सर्व कार्यक्रमांना विद्यार्थी, पालक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार, अमृत महोत्सवी वर्ष समन्वयक सचिन सरपटवार, प्राचार्य रुपचंद धारणे आणि प्राचार्य पूनम ठावरी यांनी केले आहे.

