जीव धोक्यात घालून वृद्धाचे प्राण वाचवणाऱ्या आरपीएफ जवानाचा भद्रावतीत गौरव

कर्मयोगी गाडगे महाराज स्वच्छता समिती तर्फे सत्यप्रकाश राजुरकरांचा सत्कार





भद्रावती | प्रतिनिधी - सुनील दैदावार :  कर्तव्य बजावताना जीवाची पर्वा न करता एका वृद्धाचे प्राण वाचवणाऱ्या आरपीएफ हेड कॉन्स्टेबल सत्यप्रकाश राजुरकर यांचा कर्मयोगी गाडगे महाराज स्वच्छता समितीच्या वतीने भद्रावती येथे सत्कार करण्यात आला. मध्य प्रदेशातील बैतूल रेल्वे स्थानकावर गाडी क्रमांक १२८०४ सायंकाळी ७ वाजता विलंबाने सुटणार असल्याने प्लॅटफॉर्मवर थांबलेले जैन धर्मातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रवचनकार डॉ. राकेश जैन शास्त्री हे मोबाईलमध्ये व्यस्त होते. अचानक गाडी सुटल्याचे लक्षात येताच त्यांनी धाव घेत गाडीत चढण्याचा प्रयत्न केला. मात्र हात घसरल्याने ते गाडीखाली येण्याच्या स्थितीत होते. याच वेळी कर्तव्यावर असलेले आरपीएफचे हेड कॉन्स्टेबल, भद्रावती तालुक्यातील कोच्ची गावाचे सुपुत्र सत्यप्रकाश राजुरकर यांनी क्षणाचाही विलंब न करता प्रसंगावधान राखले आणि धाव घेत वृद्धाचे प्राण वाचवले. काही सेकंदांचा उशीर झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, असेच या घटनेबाबत म्हणावे लागेल. 


या धाडसी कामगिरीची दखल घेत मध्य रेल्वेचे प्रभारी अधिकारी राजेश बनकर यांनी सत्यप्रकाश राजुरकर यांची महाप्रबंधक सुरक्षा पुरस्कारासाठी शिफारस केली असून मध्य रेल्वेच्या वतीने त्यांचा सन्मानही करण्यात आला आहे. दिनांक १० रोजी (शनिवार) ते आपल्या कोच्ची या स्वगावी आले असता, भद्रावती येथे आस्थादाई समाज मंडळ (धनोजे कुणबी) तसेच गवराळा येथील जय जगन्नाथ महाराज सेवानिवृत्त मित्र मंडळ संचालित कर्मयोगी गाडगे महाराज स्वच्छता समिती यांच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. समितीचे अध्यक्ष मंगेश येरमे यांच्या संकल्पनेतून ज्येष्ठ सदस्य प्रभाकर निमकर, शामराव खापणे, उद्धव निळे, बंडू परचाके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र राजुरकर यांनी तर आभार प्रदर्शन मंगेश येरमे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बाबा निखाडे, अरुण येरकाडे, दिनकर घाटे, महादेव मडावी, पांडुरंग कोयचाडे, तुळशीराम पोहनकर, हनुमान येरमे, सूर्यभान परचाके, महादेव डोंगे, श्रावण येरमे, सुखदेव पत्रकार, लिमेश माणूसमारे आदींनी सहकार्य केले.कर्मयोगी गाडगे महाराज स्वच्छता समितीच्या नित्यक्रमानुसार ग्रामसफाई करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.