Top News

Big Breaking : आणखी एक विमान दुर्घटना; आकाशातून मृत्यूचे सावट, खासदारासह 15 जणांचा दुर्दैवी अंत

Big Breaking : आणखी एक विमान दुर्घटना; आकाशातून मृत्यूचे सावट, खासदारासह 15 जणांचा दुर्दैवी अंत




भारतामध्ये विमान दुर्घटनेची घटना घडलेली असतानाच त्याच दिवशी दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशातही भीषण विमान अपघात झाला. या दुर्घटनेत एका खासदारासह 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतातील घटनेप्रमाणेच कोलंबियातील या अपघातातही राजकीय क्षेत्रातील व्यक्ती बळी ठरल्या आहेत.

बुधवारी भारतात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लिअरजेट खासगी विमानाचा अपघात झाला. मुंबईहून बारामतीकडे जात असताना लँडिंगदरम्यान विमान कोसळले आणि या दुर्घटनेत अजित पवार यांचा मृत्यू झाला. या घटनेला अवघा एक दिवसही उलटलेला नसतानाच, बुधवारीच जगाच्या दुसऱ्या टोकावर आणखी एक विमान दुर्घटना घडली.

कोलंबियाच्या ईशान्य भागातील नॉर्टे डी सॅन्टेंडर प्रांतातील ग्रामीण भागात एक प्रवासी विमान कोसळले. या दुर्घटनेत विमानातील सर्व 15 प्रवाशांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये एक विद्यमान खासदाराचाही समावेश आहे.

अपघातग्रस्त विमान हे बीचक्राफ्ट 1900 मॉडेलचे ट्विन-प्रॉपेलर विमान होते. हे विमान कोलंबियाच्या सरकारी विमानसेवा कंपनी सतेना (SATENA) कडून चालवले जात होते. विमानाने दुपारच्या सुमारास कुकूता येथून उड्डाण केले होते आणि ते ओकाना येथे उतरणार होते. मात्र, त्याआधीच विमानाचा हवाई नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला.

कुकूता परिसर हा डोंगराळ असून तेथे हवामान झपाट्याने बदलत असल्याने विमान वाहतुकीसाठी हा भाग आव्हानात्मक मानला जातो. याशिवाय, या प्रदेशातील मोठ्या भागावर कोलंबियाच्या सर्वात मोठ्या गुरिल्ला संघटना नॅशनल लिबरेशन आर्मी (ELN) चा प्रभाव असल्याचेही सांगितले जाते.

कोलंबियाच्या परिवहन मंत्रालयाने दिलेल्या निवेदनानुसार, घटनास्थळी विमान सापडल्यानंतर तपासणी करण्यात आली असता विमानातील एकही व्यक्ती जिवंत नसल्याची पुष्टी झाली. HK-4709 नोंदणी क्रमांक असलेल्या या विमानाने स्थानिक वेळेनुसार सकाळी 11 वाजून 42 मिनिटांनी कुकूता विमानतळावरून उड्डाण केले होते. ही उड्डाण सेवा साधारणपणे 40 मिनिटांची होती.

‘सतेना’ कंपनीच्या माहितीनुसार, उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमानाचा हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणेशी संपर्क तुटला. त्यानंतर कुरासिका भागातील स्थानिक अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची माहिती प्रशासनाला दिली. प्रवाशांची स्थिती जाणून घेण्यासाठी तत्काळ बचाव पथक रवाना करण्यात आले.

या विमानात दोन चालक दल सदस्यांसह कोलंबियाच्या प्रतिनिधी सभेचे खासदार डायोजेनेस किंतेरो आणि 13 प्रवासी प्रवास करत होते. अपघातानंतर सरकारने विमानाचे अवशेष आणि मृतदेह शोधण्यासाठी वायुसेनेला तैनात केले आहे.

या दुर्घटनेत एक विद्यमान खासदार आणि आगामी निवडणुकांमध्ये उमेदवारी करणार असलेला एक संभाव्य उमेदवार विमानात असल्याची माहिती आहे. स्थानिक खासदार विल्मर कॅरिलो यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे सहकारी डायोजेनेस किंतेरो, कार्लोस साल्सेडो आणि त्यांची संपूर्ण टीम याच विमानात प्रवास करत होती. किंतेरो हे सध्याचे खासदार होते, तर कार्लोस साल्सेडो हे आगामी निवडणुकांमधील उमेदवार असल्याचे सांगितले जात आहे.

Previous Post Next Post