आदिवासी एकजुटीचा निर्धार; चंद्रपूरात क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी.
चंद्रपूर : क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंतीनिमित्त क्रांतिवीर बिरसामुंडा उत्सव समिती, चंद्रपूर यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, रेल्वे स्टेशनजवळ भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी दुपारी ३ वाजता शहीद वीर बाबुराव शेडमाके स्मृतीस्थळापासून भव्य रॅली काढण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्घाटन चंद्रपूरचे आमदार मा. किशोर जोरगेवार यांच्या हस्ते झाले. मार्गदर्शन करताना त्यांनी आदिवासी समाजाने एकजुटीने कार्य करावे, असे आवाहन केले. समाजासाठी सामाजिक भवन उपलब्ध करून देण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन देत आपण सदैव समाजाच्या पाठीशी उभे राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. विजय सिडाम, ईटो प्रमुख तथा विदर्भ महासचिव, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद (नवी दिल्ली) होते. त्यांनी क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या “माझी भूमी, माझे राज्य” या संकल्पनेचा उल्लेख करत आदिवासींच्या जमीन व स्वातंत्र्याच्या हक्कांसाठी दिलेल्या “उलगुलान” या लढ्याची माहिती दिली. आदिवासी समाजाला एकत्र आणून हक्कांसाठी संघर्षाची प्रेरणा दिल्यामुळे बिरसा मुंडा यांना “धरती आबा” म्हणून ओळखले जाते, असे त्यांनी सांगितले. जल, जंगल आणि जमीन म्हणजे आपले जंगल, आपली जमीन, आपले लोक व आपली सत्ता यासाठी एकत्रितपणे लढण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
यावेळी मा. प्रा. जावेद पाशा (नागपूर) यांनी आदिवासींनी बिरसा मुंडा यांचे आंदोलन तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे वाचन व आत्मसात करावे, असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाला आंबेडकरी विचारवंत मा. खुशाल तेलंग, डॉ. ममता आदे (CGHS), विलास मसराम, अॅड. अशोक तुमराम, शीतल किशोर आत्राम यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन कन्नाके मॅडम यांनी केले, तर आभारप्रदर्शन अॅड. अशोक तुमराम यांनी मानले.
या कार्यक्रमास जिल्ह्यातील मोठ्या संख्येने आदिवासी समाजबांधव उपस्थित होते. यामध्ये ईटोचे विदर्भ अध्यक्ष राजेंद्र धुर्वे, अशोक ऊइके, अनिल सुरपाम, शंकर ऊइके, वारलु मेश्राम, ड्रीफुल आत्राम, कमलेश आत्राम, प्रल्हाद कोटनाके, वैशाली मेश्राम, पोर्णिमा मेश्राम, पुरुषोत्तम सोयाम यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
