Top News

Chandrapur district will get two ministers?... A banner appeared on social media with the words "future minister" written by MLA Bunty Bhangadia. चंद्रपूर जिल्ह्याला लाभणार दोन मंत्री?...आमदार बंटी भांगडिया यांचे भावी मंत्री लिहिलेले सोशल मीडिया वर झळकले बॅनर..

चंद्रपूर जिल्ह्याला लाभणार दोन मंत्री?...आमदार बंटी भांगडिया यांचे भावी मंत्री लिहिलेले सोशल मीडिया वर झळकले बॅनर..




चंद्रपूर : जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रांपैकी तब्बल पाच क्षेत्रांमध्ये भाजपचे आमदार निवडून आले. राज्यामध्ये महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे. यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश आमदार मुंबईला गेले आहेत. मात्र, आता मंत्रिपदावरून जिल्ह्यात चर्चांना उधाण आले आहे. जिल्ह्याला यावेळी दोन मंत्रिपदे मिळतील, अशी आशा नागरिकांना आहे.

राज्यातील हेवीवेट नेते म्हणून ओळख असलेले आणि मागील सात वेळा विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून आलेले जिल्ह्यातील एकमेव नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मागील टर्ममध्ये वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्रिपद तसेच ते जिल्ह्याचे पालकमंत्रीसुद्धा होते. दरम्यान, २०१४ मध्ये ते वित्तमंत्री होते. त्यामुळे यावेळी त्यांच्याकडे राज्यातील वजनदार मंत्रिपद राहील, असा विश्वास राजकीय वर्तुळामध्ये व्यक्त केला जात आहे.

वीशेष म्हणजे, विधानसभा सभागृहातील मागील अनेक वर्षांचा अनुभव बघता त्यांच्याकडे भाजपमधील वरिष्ठ नेते मोठी जबाबदारी देतील, अशीही चर्चा जिल्ह्यात ऐकायला मिळत आहे. चिमूर विधानसभा क्षेत्रातून मागील तीन वेळा निवडून आलेले भाजपचे बंटी भांगडिया यांनाही यावेळी मंत्रिपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिमूरमध्ये भांगडिया यांच्या प्रचारासाठी सभा घेतली होती. या क्षेत्राकडे पंतप्रधानांचे विशेष लक्ष राहणार आहे. त्यामुळे भांगडिया यांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे.

सोशल मीडिया वर झळकले बॅनर 

राज्यातील विधानसभा निवडणुकीचे सर्वत्र निकाल लागले. सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग येताच तीन ते चार टर्म झालेल्या आमदारांना मंत्रिपदाचे वेध लागले आहे. निकाल लागल्याच्या दुसऱ्याच दिवशी अनेक आमदार मुंबईला तळ ठोकून बसले आहेत. यात विजयाची हॅट्ट्रिक करणारे चिमूरचे आमदार बंटी भांगडिया अपवाद ठरले नाही. दरम्यान, सोशल मिडियावर भावी मंत्री म्हणून बॅनर झळकल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीची लढत अनेक ठिकाणी अटीतटीची झाली होती. अनेक दिग्गज भुईसपाट झाले. तर अनेकांनी विजयश्री मिळविली.

चिमूर विधानसभा क्षेत्रातील निवडणूक प्रतिष्ठेची होती. चिमूर विधानसभा क्षेत्रातून आमदार बंटी भांगडिया यांनी तिसऱ्यांदा विजय संपादन केले आहे. चिमूर विधानसभा क्षेत्रातील मतदारांत सुद्धा चिमूर विधानसभा क्षेत्रात लाल दिव्याची गाडी पाहिजे असून, आमदार बंटी भांगडिया यांना मंत्रिपद मिळावेत, अशी अपेक्षा मतदारांकडून होतो आहे.

आमदार बंटी भांगडिया निवडणुकीत विजय झाल्याबरोबर काही सोशल मीडियावर भावी मंत्री म्हणून बॅनरचे पोस्ट फिरू लागली आहेत. त्यामुळे मतदारांच्या अधिक अपेक्षा असल्याने आमदार बंटी भांगडिया मंत्री झाल्याने चिमूर विधानसभा क्षेत्राचा अधिक जोमाने विकास होईल, अशीही अपेक्षा मतदारांनी केली आहे. त्यामुळे आता राज्याच्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहेत.

जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार

जिल्ह्यात सहा विधानसभा क्षेत्र आहे. या सहापैकी पाच विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपचे आमदार निवडून आले. या पाचजणांपैकी सुधीर मुनगंटीवार, बंटी भांगडिया, किशोर जोरगेवार हे तिघे यापूर्वीही आमदार होते, तर राजुरा विधानसभा क्षेत्रातून निवडून आलेले देवराव भोंगळे आणि वरोरा क्षेत्रातून करण देवतळे हे दोघे पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचले आहेत.




Previous Post Next Post