विदर्भातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.
या दिवशी होणार विदर्भात मान्सूनचं आगमन.
विदर्भ माझा न्युज 24 - नागपुर
राज्याच्या अनेक भागांमध्ये दाखल झालेला मान्सून लवकरच विदर्भातही प्रवेश करणार आहे. 12 ते 14 जूनदरम्यान मान्सूनचे विदर्भात आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. या काळात मान्सून गडचिरोली, गोंदिया हा सारा परिसर व्यापेल, असा अंदाज नागपूर हवामान विभागाचे संचालक मोहनलाल शाहू यांनी वर्तविला आहे. विदर्भातील शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. आजपासून विदर्भाच्या बऱ्याच भागात पुर्वमौसमी पावसाची शक्यता आहे. तर 11 तारखेला पूर्व विदर्भात चांगला पाऊस पडेल, असेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात, राज्यात पुढचे 4 दिवस धुवाँधार पावसाचा अंदाज
मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस बरसत आहे. मुंबई उपनगरातील अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर या भागात सकाळपासून धुवाँधार पाऊस बरसत आहे. ढगाळ वातावरण आणि बरसणाऱ्या पावसाने परिसरात काळोख दाटला आहे. राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर आता तो जोर पकडणार असल्याचं चिन्हं आहे.
मुंबईसह कोकणकिनारपट्टीवर ढगांनी गर्दी केली आहे. त्यामुळे मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगडमध्ये ढगाळ वातावरण आहे. तर मुंबईच्या बऱ्याच भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यातच हवामान विभागाकडून मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 4 दिवस हे मुंबईसाठी धोक्याचे असणार आहे. या काळात 300 मिलिमीटहून जास्त पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मुंबईसह कोकण किनारपट्टीवर ढगांची गर्दी
सध्या मुंबईसह कोकण किनारपट्टीवर ढगांनी गर्दी केली आहे. हवामान शास्रज्ञ के एस होसळीकर यांनी याबाबतचं ट्विटही केलं आहे. मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोव्यासह पश्चिम किनारपट्टीवर ढगांची दाटी दिसते आहे. सध्या मध्य महाराष्ट्र ते केरळपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीवर तुफानी पावसाची परिस्थिती तयार झाली आहे.
पुढच्या 24 तासांत कुठं कसा पाऊस?
पुढच्या 24 तासांत मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. यशिवाय मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगरमध्येही तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाड्यात हलक्या पावसाचा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने वर्तवला आहे.
