फुगडी-झिम्म्यानी गाजला कोरपण्याचा मंगळागौर महोत्सव

फुगडी-झिम्म्यानी गाजला कोरपण्याचा मंगळागौर महोत्सव

युवा प्रतिष्ठान व विजयराव बावणे मित्र परिवाराचे आयोजन ; महिलांचा मोठा सहभाग




कोरपना | कोरपना - जिवती सर्कल प्रतिनिधी जगदीश खनके : श्रावण महिन्यातील पारंपरिक उत्सव म्हणून प्रसिद्ध असलेला मंगळागौर सांस्कृतिक महोत्सव युवा प्रतिष्ठान व विजयराव बावणे मित्र परिवार, कोरपना यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. २४ ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण सभागृह, कोरपना येथे अत्यंत उत्साहात पार पडला.

महिलांच्या मोठ्या सहभागामुळे महोत्सव रंगतदार झाला. कार्यक्रमात प्रश्नमंजुषा, मंगळागौर सांस्कृतिक समूह नृत्य, गायन, सोलो डान्स, ग्रुप डान्स, विविध खेळ अशा बहारदार सादरीकरणांनी उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.

विशेष आकर्षण ठरले ते महिलांनी सादर केलेले फुगडी, झिम्मा, भरड्या, पोशंपा यांसारखे पारंपरिक खेळ. टाळ्यांचा गजर, पारंपरिक गाणी व उत्साही स्वरांनी वातावरण भारावून टाकले होते.

या प्रसंगी नगराध्यक्ष नंदा बावणे, राजुरा पंचायत समितीच्या माजी सभापती कुंदा जेनेकर, ज्योती रेगुंडवार, मालती बोडखे, सुनिता गिरसावळे, धुमाळ आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक चारुलता बावणे यांनी केले. रेवती लोडेलीना गिरटकर यांनी कार्यक्रमाचे कुशल संचालन केले तर विशाखा गिरसावळे यांनी आभार मानले.

महोत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी प्रभा गिरटकर, वंदना वरभे, कल्याणी बावणे, प्रियंका खनके, विद्या खाडे, जया नागपुरे, पायल गिरडकर, प्रिया मोहितकर, प्रीती बुटले, स्मिता बुराण, पल्लवी मालेकर, सोनु तिजारे, आडकिने, गभणे, उज्वला धारणकर, अश्विनी आस्वले आदींसह युवा प्रतिष्ठान व विजयराव बावणे मित्र परिवाराच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

या सांस्कृतिक सोहळ्यात हजारोंच्या संख्येने महिला उपस्थित होत्या. सहभागी महिलांना स्मृतिचिन्ह व पारितोषिके प्रदान करण्यात आली.