बल्हारशाह येथे गणेशोत्सव व ईद-ऐ-मिलादुन्नबीसाठी प्रशासन सज्ज...
बल्हारशाह : आगामी गणेश चतुर्थी व ईद-ऐ-मिलादुन्नबी या दोन महत्त्वाच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बल्हारशाह नगर परिषदेने तयारीची लगबग सुरू केली आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, संवेदनशील भागांमध्ये स्वच्छता व वाहतूक नियोजनाची कामे सुरू असून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जात आहे.
शहरातील दोन भागांना जोडणारा गोल पुलिया रस्ता हा गेल्या काही दिवसांपासून खड्डेमय झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. विशेषतः रेल्वे मार्गामुळे या रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी होत असे. नागरिकांच्या मागणीनंतर अखेर नगर परिषदेने या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले.
हे काम दिनांक २६ ऑगस्ट २०२५ रोजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आले. स्थापत्य अभियंता मयुर दहीकर यांच्या नेतृत्वाखाली कनिष्ठ अभियंता कृष्णा गुलाणे, बांधकाम पर्यवेक्षक प्रणय वाटेकर व त्यांच्या टीमने युद्धपातळीवर काम पूर्ण केले. या कामात शहर पोलीस प्रशासनानेही विशेष सहकार्य केले.
या कामाबाबत बोलताना स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. “सणासुदीच्या काळात रस्त्याची दुरुस्ती झाल्याने आता वाहतूक सुरळीत होईल. इतके दिवस त्रास होत होता, पण आता दिलासा मिळाला आहे,” असे एका रहिवाशाने सांगितले.
दरम्यान, सणाच्या काळात गर्दीचा ताण लक्षात घेता शहरातील प्रमुख रस्त्यांवर स्वच्छता मोहीम, वाहतूक नियंत्रण, तसेच वीज व पाणीपुरवठा याबाबतही प्रशासनाने तयारी केली आहे.
👉 नागरिकांना अडचण होऊ नये आणि उत्सव शांततेत पार पडावा, यासाठी नगर परिषद, पोलीस प्रशासन व स्थानिक यंत्रणा सज्ज असल्याचे स्पष्ट झाले आहे.