मेजर ध्यानचंद जयंतीनिमित्त नागभीडमध्ये ‘सदभावना दौड’ – विजेत्यांना रोख पारितोषिक व सन्मानचिन्हाने गौरव
नागभीड : स्थानिक राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय, नागभीड येथे हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांची जयंती तथा राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाच्या वतीने ‘सदभावना दौड स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. डी. देशमुख यांनी भूषविले. उद्घाटक म्हणून हरिभाऊ गरफडे (माजी प्राचार्य, कर्मवीर कनिष्ठ महाविद्यालय, नागभीड) उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून किरण संजय गजपुरे (सिनेट सदस्य, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली), प्रिया लांबट, श्रीकृष्ण देव्हारी, अजय काबरा, दिनेश गावंडे तसेच नागभीड येथील प्रतिष्ठित नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शविली.
कार्यक्रमाची सुरुवात मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर हिरवी झेंडी दाखवून सदभावना दौड स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.
या स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
-
विद्यार्थी गटात: प्रथम – अंकित दोडके, द्वितीय – प्रज्वल शिवणकर, तृतीय – डीगेश मारोदे.
-
विद्यार्थिनी गटात: प्रथम – कु. कीर्ती नान्हे, द्वितीय – कु. धनश्री सहारे, तृतीय – कु. लक्ष्मी मानकर.
विजेत्यांना प्रथम क्रमांक ₹2000, द्वितीय ₹1500, तृतीय ₹1000 रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. तसेच पहिल्या दहा स्पर्धकांना बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नागभीडकडून टी-शर्ट देण्यात आले.
बक्षीस वितरण कार्यक्रमात प्राचार्य डॉ. जी. डी. देशमुख अध्यक्षस्थानावर होते. प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत विजेत्यांना गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन प्रा. किशोर बोरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. धनंजय मडावी यांनी केले.
या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापक सावरकर, प्रिया लांबट, हरिभाऊ गरफडे, विनोदराव अमदावाडी, दिनेश गावंडे, उमेश वारजूरकर यांचे आर्थिक सहकार्य लाभले. पुरस्कारांचे सन्मानचिन्ह श्रीकृष्ण देव्हारी यांनी दिले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस स्टेशन नागभीड, प्राथमिक आरोग्य केंद्र नागभीड, व्यापारी संघटना, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.