प्राचार्या रंजना तरारे यांचा सेवानिवृत्ती सोहळा उत्साहात संपन्न.....

प्राचार्या रंजना तरारे यांचा सेवानिवृत्ती सोहळा उत्साहात संपन्न..... 


✍️ *प्रतिनिधी, नागभीड*

नागभीड (ता. ३१ जुलै) – जनता शिक्षण संस्था, नागभीड द्वारा संचालित जनता कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या रंजना रविशंकर तरारे यांचा सेवानिवृत्ती सोहळा मोठ्या उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

नियत वयोमानानुसार ३१ जुलै २०२५ रोजी प्राचार्या पदावरून सेवानिवृत्त झालेल्या रंजना तरारे यांचा निरोप समारंभ जनता शिक्षण संस्था, एमसीव्हीसी विभाग, जनता कन्या विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय आणि जनता कॉन्व्हेंट स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अमीर धमानी होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव डॉ. रवींद्र कावळे, उपाध्यक्ष अतुल चिल्लूरे, चक्रधर रोहनकर, सहसचिव रवींद्र समर्थ, कोषाध्यक्षा मनीषा चव्हाण, संस्था सदस्य ॲड. गोविंदराव भेंडारकर, प्राचार्य एस.टी. कोरे, पर्यवेक्षक एस.डी. जाधव, सीमा देशमुख तसेच सत्कारमूर्ती रंजना तरारे आणि त्यांचे पती रविशंकर तरारे यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमात विविध मान्यवरांनी आपल्या भाषणांतून रंजना तरारे यांच्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेस उजाळा दिला. त्यांच्या कार्यकुशलतेचे, शिस्तशीर प्रशासनाचे आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या समर्पणाचे सर्वांनीच विशेष उल्लेख करून कौतुक केले.

अध्यक्षीय भाषणात डॉ. अमीर धमानी यांनी, तरारे यांच्या कार्यशैलीत स्पष्टता, नियोजन, सहकाऱ्यांशी समन्वय आणि संस्थेच्या प्रगतीसाठी असलेली तळमळ विशेष होती,” असे सांगून त्यांच्या पुढील जीवनास शुभेच्छा दिल्या. संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन रंजना तरारे यांचा सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना रंजना तरारे यांनी आपल्या कार्यकाळातील अनुभव शेअर करताना भावनिक होत सर्व पदाधिकारी, सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांचे मनःपूर्वक आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. चारुलता पडोळे यांनी केले, तर आभारप्रदर्शन सुधीर सयाम यांनी केले.