Breaking News : सर्पमित्र डॉ. पवन नागरे यांच्यावर प्राणघातक हल्ला; झेप संस्थेने घेतली पोलिसात धाव, नागभीड बंदचा इशारा.....
नागभीड | प्रतिनिधी | ३० जुलै २०२५ | वन्यजीव व पर्यावरण संवर्धन क्षेत्रात कार्यरत असलेल्या झेप निसर्गमित्र बहुउद्देशीय संस्था, नागभीड चे अध्यक्ष आणि प्रसिद्ध सर्पमित्र डॉ. पवन नागरे यांच्यावर बंडीवार यांच्या कबाडी संग्रहालयात साप पकडण्यासाठी गेलेल्या वेळी प्राणघातक हल्ला करण्यात आला. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
दिनांक २९ जुलै रोजी सायंकाळी डॉ. नागरे यांना कबाडी दुकानात साप आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर, त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तेथे उपस्थित असलेल्या दोन व्यक्तींनी त्यांच्यावर शिवीगाळ केली व हातात पेचकस व काठी घेऊन अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात डॉ. नागरे यांच्या उजव्या भुजेला दुखापत झाली असून, सुदैवाने त्यांचा जीव थोडक्यात वाचला.
डॉ. नागरे यांनी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली असून, तोंडी तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, 'झेप' संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नागभीड पोलिस ठाण्यात सविस्तर लेखी निवेदन देऊन संबंधित हल्लेखोरांवर तातडीने गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली आहे.
संस्थेचे उपाध्यक्ष, सचिव व सर्व सदस्यांच्या स्वाक्षरीसह सादर करण्यात आलेल्या निवेदनात असा इशाराही देण्यात आला होता की, जर संबंधित आरोपींवर कठोर कारवाई झाली नाही, तर ‘झेप’ संस्थेच्या वतीने नागभीड बंद पुकारण्यात येणार असल्याची माहिती निवेदनात नमुद केली आहे.
डॉ. पवन नागरे हे गेल्या २५ वर्षांपासून हजारो साप, प्राणी आणि पक्ष्यांचे प्राण वाचवणारे कार्य करत असून त्यांच्या कार्यामुळे संपूर्ण विदर्भात त्यांना एक मान्यवर पर्यावरण कार्यकर्ता म्हणून ओळख मिळाली आहे. त्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात असून या प्रकाराने वन्यजीव कार्यकर्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
मात्र नागभीड पोलीसांनी क्षणाचा विलंब न करता आरोपी विरुद्ध दोन्ही व्यक्तींवर भारतीय न्याय संहिता ( बी एन एस ) 2023 कलम 115 (2) व भारतीय न्याय संहिता ( बी एन एस ) 2023 कलम 352 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपी पोलीसांच्या ताब्यात आहे. घटनेचा अधिक तपास नागभीड पोलीस करीत आहे.
निवेदन देताना उपस्थित
अध्यक्ष. पवन नागरे
उपाध्यक्ष. अमोल वानखेडे
सचिव. अमित देशमुख
सदस्य. ओमप्रकाश मेश्राम
पराग भानारकर
प्रशांत बोरकुटे
क्षितिज गरमडे
गुलाब राऊत
रितेश कोरे
तुषार गजभे
गुड्डू भोयर