Top News

तरुणाईचा आवाज बुलंद! १,००० युवकांच्या सहभागातून ‘भारत थ्रू द आइज ऑफ यूथ’ अहवाल सादर

 शिक्षणाला सर्वाधिक प्राधान्य; रोजगार, महिला सुरक्षा आणि मानसिक आरोग्याबाबतही युवकांनी व्यक्त केल्या अपेक्षा – ९१.६ टक्के युवकांना निर्णय प्रक्रियेत आपले मत ऐकले जात नसल्याची भावना




यवतमाळ : देशातील तरुणाईला नेमके काय हवे आहे? त्यांच्या समस्या कोणत्या आहेत? तसेच देशाच्या विकासासंदर्भातील निर्णय प्रक्रियेत त्यांच्या मतांना कितपत महत्त्व दिले जाते? या प्रश्नांचा वेध घेण्यासाठी युवकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या ‘सपोर्ट विंग्स’ या युवा संघटनेने ‘१००० व्हॉइसेस – भारत थ्रू द आइज ऑफ यूथ’ हा विशेष अहवाल तयार केला आहे. या उपक्रमांतर्गत देशभरातील १,००० युवकांच्या विचारांना, अपेक्षांना आणि समस्यांना व्यासपीठ मिळाले आहे.

शिक्षण हा युवकांचा सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा

या अहवालातील निष्कर्षांनुसार, ४५.७ टक्के युवकांनी शिक्षणाला सर्वाधिक प्राधान्य देत या क्षेत्रात तातडीने गुंतवणूक करण्याची गरज व्यक्त केली आहे. त्यापाठोपाठ रोजगार व करिअरच्या संधी (३०.३ टक्के), महिलांची सुरक्षा (२९.७ टक्के), मानसिक आरोग्यासाठी मदत (२९.५ टक्के) आणि कौशल्य विकास (२८.९ टक्के) हे महत्त्वाचे मुद्दे समोर आले आहेत.

विशेष म्हणजे, ५६.५ टक्के युवकांनी भ्रष्टाचार आणि पक्षपाताला यशाच्या मार्गातील मोठा अडथळा असल्याचे नमूद केले आहे. तर तब्बल ९१.६ टक्के युवकांना निर्णय प्रक्रियेत आपले म्हणणे सातत्याने ऐकून घेतले जात नसल्याची भावना असल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे.

सुमारे २० राज्यांतील युवकांचा सहभाग

‘सपोर्ट विंग्स’ने या उपक्रमाची सुरुवात ‘तुमच्या समुदायात तुम्हाला कोणता एक बदल घडलेला पाहायला आवडेल?’ या प्रश्नाने केली. त्यानंतर युवकांच्या समस्या, भविष्यातील स्वप्ने, सामाजिक दबाव, शिक्षण आणि रोजगारातील दरी, व्यावहारिक कौशल्ये तसेच मानसिक स्वास्थ्य अशा विविध विषयांचा अभ्यास करण्यात आला.

यासाठी खुल्या स्वरूपातील प्रश्नावली तयार करून संघटनेचे युवा नेटवर्क, सोशल मीडिया, इंटर्न्स, स्वयंसेवक आणि विविध संपर्क माध्यमांतून युवकांची मते जाणून घेण्यात आली. या उपक्रमात देशातील सुमारे २० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील युवकांनी सहभाग नोंदविला.

हा अहवाल सहभागी युवकांच्या प्रतिसादांवर आधारित असून, संपूर्ण भारतातील युवकसंख्येचे सांख्यिकीय प्रतिनिधित्व करण्याचा दावा संघटनेने केलेला नाही.

युवकांचे म्हणणे निर्णयकर्त्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न

केवळ अहवाल तयार करण्यापुरता हा उपक्रम मर्यादित न ठेवता त्यातील निष्कर्षांच्या आधारे युवक, सामाजिक संस्था आणि निर्णयकर्त्यांमध्ये संवाद घडवून आणण्याचा सपोर्ट विंग्सचा प्रयत्न आहे. भविष्यात या उपक्रमाचा विस्तार करून युवकांना निर्णय प्रक्रियेत अधिक अर्थपूर्ण सहभागाची संधी उपलब्ध करून देण्याचे संघटनेचे उद्दिष्ट आहे.

युवकांना चांगल्या शैक्षणिक संधी, रोजगार, कौशल्य विकास, सुरक्षित वातावरण आणि मानसिक आधारव्यवस्था हवी आहे. त्याचबरोबर त्यांच्या मतांना आणि विचारांना योग्य व्यासपीठ मिळावे, ही त्यांची प्रमुख अपेक्षा असल्याचे या अहवालातून अधोरेखित झाले आहे.

यवतमाळमधून सुरू झालेली युवा चळवळ

‘सपोर्ट विंग्स’ ही युवकांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेली संघटना असून, महाराष्ट्रातील यवतमाळ येथून सामाजिक परिवर्तन आणि युवक सक्षमीकरणाच्या उद्देशाने तिची सुरुवात झाली. सध्या संघटनेचे नेटवर्क देशातील २६ हून अधिक राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील ९० हून अधिक शहरांमध्ये विस्तारले आहे. युवकांसाठी विविध उपक्रम, इंटर्नशिप, जनजागृती मोहिमा आणि समुदायाधारित कार्यक्रमांच्या माध्यमातून संघटना कार्यरत आहे.

‘१००० व्हॉइसेस – भारत थ्रू द आइज ऑफ यूथ’ हा २०२६ मधील अहवाल म्हणजे देशातील तरुणाईच्या अपेक्षा, अडचणी आणि भविष्याविषयीच्या दृष्टिकोनाचा आरसा ठरत असून, भारताच्या भविष्याची दिशा ठरविताना युवकांच्या आवाजालाही तितकेच महत्त्व मिळावे, हा या उपक्रमाचा मुख्य संदेश आहे.

Previous Post Next Post