देवेंद्र फडणवीस ठरले किंगमेकर,एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री.....
एकनाथ शिंदे आज संध्याकाळी ७.३० वाजता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.....
विदर्भ माझा न्युज 24 - मुंबई
महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवत भाजपने जास्त आमदार असूनही मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय घेतला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री होण्याऐवजी महाराष्ट्राचा किंमगेकर होऊन नवे राजकीय समीकरण विकसित केले आहे. याआधी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील अशी चर्चा होती. प्रत्यक्षात फडणवीस यांनीच स्वतः घोषणा केली आणि एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचे जाहीर केले. एकनाथ शिंदे आज गुरुवार ३० जून २०२२ संध्याकाळी ७.३० वाजता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.
उद्धव ठाकरे यांचे समर्थन करणाऱ्या शिवसेना आमदारांनी जाहीरपणे एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार चालविणे म्हणजे शिवसेनेवर अन्याय आहे, अशी भाषा आमदार बोलू लागले. हळू हळू आमदारांच्या संख्येत वाढ होत गेली. ही संख्या वाढली आणि बहुमत चाचणीला सामोरे जाण्याऐवजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणे पसंत केले.
महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री असतानाही पक्षात मोठ्या प्रमाणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात नाराजीचे सूर उमटू लागले. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यात सत्तेत असताना हा प्रकार घडला. उद्धव ठाकरे यांची विधीमंडळातील शिवसेना आमदारांवरील पकड ढिली झाली. यानंतर ठाकरे सरकारने राजीनामा दिला. या घडामोडींमध्ये एकनाथ शिंदे यांची भूमिका महत्त्वाची असल्यामुळे भाजपने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात नवे सरकार स्थापन करण्याचा तसेच या सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या पहिल्या टर्ममध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित महत्त्वाच्या जबाबदाऱ्या होत्या. यावेळी एकनाथ शिंदे हेच राज्याचे मुख्यमंत्री होत आहेत. त्यामुळे ते स्वतःकडे कोणकोणत्या खात्यांची जबाबदारी ठेवणार यावरून तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
लवकरच मुंबई, ठाण्यासह राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी राज्य शासन म्हणून प्रभावी कामगिरी करण्याचे आव्हान नव्या सरकारपुढे आहे. हे आव्हान एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात नवे सरकार कसे पेलणार याविषयी तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
खातेवाटपावरून चर्चा
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात नाराजी व्यक्त करत एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक मागील काही दिवस गुवाहाटी येथे मुक्काम करून होते. तिथून शिंदे गट गोव्यात दाखल झाला आहे. गोव्यातून भाजपसोबत चर्चेसाठी एकनाथ शिंदे मुंबईत आले आहे. एकनाथ शिंदे आणि भाजप नेत्यांमध्ये आज गुरुवार ३० जून २०२२ दुपारी मंत्रिमंडळाची रचना, खातेवाटप या मुद्यांवर चर्चा झाली. अद्याप या संदर्भात सविस्तर माहिती हाती आलेली नाही. पण एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होणार आणि शिंदे गटातील आमदारांना या मंत्रिमंडळात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या हाताळण्याची संधी मिळणार असल्याचे सूत्रांकडून समजते


