महाराष्ट्राच्या प्रगतीत चंद्रपूर जिल्ह्याचा मोलाचा वाटा - आमदार सुधीर मुनगंटीवार
बल्हारशाह : महाराष्ट्र राज्याचा मंगल कलश स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या हाती सुपूर्द केला. १ मे १९६० पासून महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या जनतेने प्रामाणिक मेहनत, अथक परिश्रम आणि कर्तृत्वाच्या जोरावर महाराष्ट्राला देशात अग्रस्थानी पोहोचवले आहे. आज महाराष्ट्र, देशाच्या आर्थिक प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. एकट्या महाराष्ट्राचे देशाच्या एकूण जीएसटीच्या उत्पन्नात २० टक्क्यांहून अधिक योगदान असून, उद्योगक्षेत्रात हे योगदान आणखी अधिक आहे. तसेच देशाच्या एकूण जीडीपीमध्ये महाराष्ट्राचा वाटा १५ टक्के आहे, हे अत्यंत गौरवास्पद आहे. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने, आपण सर्वांनी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी स्वतःचे योगदान देण्याचा निर्धार करावा, असे आवाहन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
महाराष्ट्र दिनानिमित्त बल्हारशाह येथील तहसिल कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा,तहसीलदार रेणुका कोकाटे, नायब तहसिलदार महेंद्र फुलझेले, न. प. मुख्याधिकारी विशाल वाघ, लखनसिंग चंदेल, काशी सिंग, रनंजय सिंग, शिवचंद द्विवेदी, बांधकाम विभागाचे येडे, जोशी आदिंची उपस्थिती होती.
आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले,महाराष्ट्र जरी आर्थिकदृष्ट्या संपन्न असला तरी आजही गावांमध्ये व शहरांमध्ये गरीब कुटुंबे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत. त्यामुळे येणाऱ्या १ मे महाराष्ट्र दिनापर्यंत प्रत्येक नागरिकाने गरजूंच्या मदतीसाठी पुढे येऊन त्यांच्या अडचणी दूर करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन आ . मुनगंटीवार यांनी केले.
बल्हारशाह विधानसभा होईल समृद्ध आणि प्रगत
महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचे रूप देण्याचे स्वप्न असून, हे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, असे आ.मुनगंटीवार यांनी यावेळी नमूद केले. बल्हारशाह क्षेत्र नेहमीच प्रगत रहावा, यासाठी अनेक विकासकामे केले आहे. भविष्यातही बल्हारशाह विधानसभा क्षेत्र अधिकाधिक प्रगत व समृद्ध होईल, असा विश्वासही आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
बल्हारशाहला स्वतंत्र एसडीओची देणगी :
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात दोन तालुक्यांसाठी एक एसडीओ कार्यालय असते. मात्र, संपूर्ण महाराष्ट्रातील एकूण तहसीलपैकी बल्लारपूर ही एकमेव तहसील आहे, जिथे स्वतंत्र एसडीओ कार्यालय आहे. ही बाब बल्हारशाहच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असल्याचे आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले.